चार महिन्यांनंतर खाद्यतेलाचा दर स्थिर; मागणी झाली कमी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:34 IST2021-04-05T04:34:52+5:302021-04-05T04:34:52+5:30
सातारा : मागील चार महिन्यांपासून खाद्यतेलाचा दर सतत वाढत होता. मात्र, सध्या मागणी कमी झाल्याने प्रथमच मागील आठवड्यात दर ...

चार महिन्यांनंतर खाद्यतेलाचा दर स्थिर; मागणी झाली कमी..
सातारा : मागील चार महिन्यांपासून खाद्यतेलाचा दर सतत वाढत होता. मात्र, सध्या मागणी कमी झाल्याने प्रथमच मागील आठवड्यात दर स्थिर राहिला. तर साताऱ्यात कांद्याचा दर उतरत असून बाजार समितीत तर अनेक दिवसांनंतर वाटाण्याला चांगला भाव मिळत आहे. रविवारी क्विंटलला सहा हजारांपर्यंत दर मिळाला.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, माण, फलटण या तालुक्यातून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. त्यानंतर भाजी मंडईत हा माल नेऊन विकला जातो. त्यामुळे दरात वाढ होत जाते.
सातारा बाजार समितीत रविवारी एकूण ३७१ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. तर कांद्याची ३९० क्विंटलची आवक झाली. या रविवारी कांद्याची आवक चांगली झाली. बाजार समितीत वांग्याला १० किलोला अवघा १०० ते १३० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर टोमॅटोला १० किलोला ८० ते १००रुपये, कोबी ४० ते ५० रुपये, फ्लाॅवरला ६० ते १०० रुपये, दोडक्याला ३०० ते ३५० रुपये भाव आला.
तेल डब्याला मागणी कमी
खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. मात्र, मागील आठवड्यात दर स्थिर राहिले आहेत. बाजारातही तेलाला मागणी कमी आहे. विशेष म्हणजे १५ किलोचा डबा घेण्याऐवजी बहुतांशी ग्राहक हे एक लिटरचा पाऊच घेतात. सूर्यफूल तेलाचा पाऊच १६० ते १७० तर शेंगदाणा तेलाचा १७० ते १७५ रुपयांना मिळत आहे.
द्राक्षाची आवक
साताऱ्यात सध्या कलिंगड आणि द्राक्षाची आवक अधिक आहे. त्यामुळे दरात फार वाढ नाही. कलिंगड १० रुपयांपासून तर द्राक्षे ४० रुपयांपासून किलोने मिळत आहेत.
लसणाला दर
बाजार समितीत भाज्यांना कमी दर आहे. गवारला १० किलोला ३०० ते ४०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवगा शेंगेला अवघा १५० ते २००, पावटा ४०० ते ४५० आणि भेंडीला ३०० ते ३५० रुपये दर मिळाला. लसणाला ६ हजार तर बटाट्याला १३०० रुपये क्विंटलपर्यंत दर निघाला.
गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर कमी होत चालले आहेत. यामुळे दिलासा असलातरी खाद्यतेलाचे दर अजूल वाढलेलेच आहेत. यामुळे खर्चातही वाढ झालेलीच आहे.
- आशा पवार, ग्राहक
कोरोनामुळे पाश्चात्य देशांची अर्थव्यवस्था खालावली. त्यामुळे त्या देशांनी निर्यात कर वाढवला आहे. परिणामी खाद्यतेलाचे दर वाढलेले आहेत. मागील आठवड्यात दर स्थिर होता.
- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी
कांद्याचा दर एकदमच खाली आला आहे. त्यामुळे खर्चतरी निघेल का नाही, अशी स्थिती आहे. त्यातच इतर भाज्यांचेही दर कमी झाले आहेत. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे.
- रामचंद्र पाटील , शेतकरी
..................................................................................................................................................................................................................................