वाई तालुक्यात ई-पीक पाहणी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:40 IST2021-09-11T04:40:21+5:302021-09-11T04:40:21+5:30

र्कवेळे : ‘राज्य शासनाच्या ई-पीक पाहणी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सर्व शेतकरी व नागरिक यांना माहिती व्हावी व त्यात त्यांचा ...

E-crop inspection in Wai taluka is in full swing | वाई तालुक्यात ई-पीक पाहणी उत्साहात

वाई तालुक्यात ई-पीक पाहणी उत्साहात

र्कवेळे : ‘राज्य शासनाच्या ई-पीक पाहणी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सर्व शेतकरी व नागरिक यांना माहिती व्हावी व त्यात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग व्हावा, यासाठी वाई तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण आयोजित केले होते. याला शेतकऱ्यांमधून चांगला प्रतिसाद मिळाला.

यावेळी तालुक्यातील सर्व तलाठी व मंडल अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांनी वाई तालुक्यातील पसरणी, एकसर, दह्याट, बोरगाव, मेणवली, बोपरडी, ओझर्डे, शिरगाव, देगाव, शेंदूरजने, खानापूर, सुरुर, कवठे, केंजळ, वेळे, चांदक, भुईंज, जांब, किकली, उडतारे, पाचवड, बावधन, असले या गावांमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांना ई-पीक पाहणी या प्रकल्पाबाबत प्रशिक्षण दिले. त्यांना ॲपच्या माध्यमातून पीकपाहणी करण्याबाबत प्रात्यक्षिक दिले.

यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व शेतकरी हजर होते. ई-पीक पाहणी हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, यामध्ये संबंधित शेतकरी हे मोबाईल ॲपच्या माध्यमातून त्यांच्या शेतातील पिकांची पीक पाहणी करून त्यांच्या सात-बारावर नोंद करू शकणार आहेत. यामुळे भविष्यात त्यांना पीक कर्ज मिळणे तसेच, सात-बारावर पिकांची अचूक नोंद होणे, तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळणे, हे सोपे होणार आहे. तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव. खातेदार यांनी त्यांची पीक पाहणी ई-पीकपाहणी ॲपच्या माध्यमातून करण्याबाबत तहसीलदार यांच्यामार्फत आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: E-crop inspection in Wai taluka is in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.