दुमदुमली लोणंदनगरी
By Admin | Updated: June 29, 2014 00:28 IST2014-06-29T00:24:29+5:302014-06-29T00:28:22+5:30
टाळ-मृदंगाचा गजर : भजनात रमले वारकरी

दुमदुमली लोणंदनगरी
लोणंद : टाळ- मृदंगाचा गजर, भजनात रमलेले वारकरी, अखंड हरिनामाचा जप करत लाखो वारकरी शनिवारी लोणंदनगरीत विसावले. विठू नामाच्या जयघोषाने अवघी लोणंदनगरी दुमदुमून गेली आहे.
माउलींचा रथ पालखीतळावर विसावल्यानंतर सायंकाळी सांज आरती झाली. शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील भाविकांनी माउलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यामुळे पालखीतळापासून दोन किलोमीटरपर्यंत पुरुष व महिलांच्या स्वतंत्र्यपणे रांगा लागल्या होत्या. प्रथेप्रमाणे सकाळी कीर्तन सोहळा पार पडला. तंबूशेजारी उभ्या असलेला माउलींचा रथ व अश्वाचेही दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. लोणंदनगरीत आलेल्या वारकऱ्यांना विविध सामाजिक संघटना, संस्था, गणेशोत्सव मंडळे व अनेक भक्तांनी वैयक्तिकरीत्याही जेवण, फराळ, फळांचे वाटप केले. माउलींसाठीमानाचा नैवेद्य घेऊन लोणंदमधील ग्रामस्थ जात होते.
पालखी आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त केला होता. अपर पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली ५ उपअधीक्षक, १६ पोलीस निरीक्षक, ५१ सहायक पोलीस निरीक्षक, ४६५ पुरुष पोलीस, ५५ महिला पोलीस, शंभर वाहतूक पोलीस जवानांसह गृहरक्षक दलाचे ४०० जवान तैनात आहेत. यामुळे चौकाचौकात पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गर्दीत अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलिसांची करडी नजर असून बॉम्ब शोधक पथक, श्वानपथक पाचारण केले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही संख्या वाढविली आहे.लोणंद शहरात संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या २५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. (वार्ताहर)