शिक्षकांच्या वादामुळे करंडी शाळेला ग्रामस्थांनी टोकले टाळे
By Admin | Updated: July 7, 2015 22:28 IST2015-07-07T22:28:46+5:302015-07-07T22:28:46+5:30
बदल्यांची मागणी : अंतर्गत वादाचा विद्यार्थ्यांना फटका

शिक्षकांच्या वादामुळे करंडी शाळेला ग्रामस्थांनी टोकले टाळे
मेंढा : करंडी, ता. जावली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या अंतर्गत वादामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या आरोप करीत करंडी ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. ०७) शाळेला टाळे ठोकले. या शाळेतील शिक्षकांच्या बदल्या कराव्यात व कायमस्वरूपी शिक्षक द्यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
करंडी, ता. जावळी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पाचवीपर्यंत प्राथमिक शाळा असून येथे चार शिक्षक व २४ विद्यार्थी आहेत. चार शिक्षकांपैकी दोन पुरूष व दोन महिला शिक्षक असून यापैकी दोन शिक्षणसेवक आहेत. या शिक्षकांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अंतर्गत वाद असून या शिक्षकांची विद्यार्थ्यांसमोर अनेकदा भांडणे होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यातच मुख्याध्यापक पॅरेलिसिस पेशंट असून एक महिला शिक्षिका गेले काही महिने रजेवर होत्या.
त्यामुळे दोन शिक्षक व पाच वर्ग व सततची भांडणे अशा प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांनी म्हणने आहे.
दरम्यान, याबाबत अनेकदा शिक्षण विभागाचे अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडे तक्रार करूनदेखील याकडे गांभिर्याने लक्ष न दिल्याने सर्व विद्यार्थ्यांना बाहेर ठेऊन शाळा कमिटी अध्यक्ष नीता चव्हाण, उपाध्यक्ष चंद्रकांत भोसले, सरपंच गेनू दुंदळे यांच्यासह ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
तालुक्यात आणखी काही शाळांमध्ये शिक्षकांच्या कामाबद्दल नाराजी असून शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना अचानक भेटी द्याव्यात अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
शाळेला टाळे ठोकणे ही नियमबाह्य कृती आहे. ही बाब वरिष्ठांकडे कळविली असून याबाबत तातडीने तोडगा काढण्यात येणार आहे.
- रमेश चव्हाण,
गटशिक्षणाधिकारी