ताणतणावामुळे डॉक्टरच बनताहेत रुग्ण!
By Admin | Updated: June 30, 2014 23:56 IST2014-06-30T23:54:13+5:302014-06-30T23:56:49+5:30
उच्च रक्तदाब व मधुमेहाने त्रस्त : व्यायामासाठी वेळ काढणारे मूठभरच

ताणतणावामुळे डॉक्टरच बनताहेत रुग्ण!
सातारा : साऱ्या जगाचं आरोग्य जपणारी डॉक्टर मंडळीच आजारी पडू लागतात, तेव्हा त्याला काय म्हणायचं? वैद्यकीय क्षेत्रातील प्रचंड स्पर्धेमुळे स्वत:चं शरीर विसरून सतत रुग्णांच्या घोळक्यात वावरणाऱ्या या डॉक्टरांनाही आजकाल मधूमेह आणि उच्च रक्तदाबाचा विकार खुणावू लागलाय.
वैद्यकशास्त्र आणि त्यातील नवनवीन ज्ञान दिवसेंदिवस मनुष्याचा प्राण वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे ज्ञान अर्जित करण्यासाठी प्रत्येक डॉक्टर प्रयत्नशील आहे. वाढते आजार आणि रूग्णांची संख्या लक्षात घेता सकाळी अकरा वाजता दवाखान्यात येणारे डॉक्टर अनेकदा रात्री उशिरा घरी जातात. पोटाला आधार म्हणून दोन रूग्णांच्या तपासणीच्या मधील काळात फळांचा रस किंवा अन्य काहीतरी खाऊन कार्यक्षमता टिकविण्याचा प्रयत्न डॉक्टर करत असल्याचे दिसते. याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर दिसतो.
अनेकदा उशिरा झोपणं आणि उशिरा उठणं यामुळे व्यायामाला दांडी मारणाऱ्या डॉक्टरांची संख्या वाढते आहे. ‘डॉक्टरांच्या हातचा गुण’ असं म्हणून मुख्य डॉक्टरांना जवळपास सर्वच रूग्ण बघावे लागतात. याचाही अतिरिक्त ताण डॉक्टरांवर येत आहे. पूर्वीच्या काळी डॉक्टर देव म्हणून ओळखले जायचे; परंतु हे सुध्दा हाडामासाचे मानवच आहेत, याची जाणीव व्हायला हवी. (लोकमत टीम)