निधीअभावी रखडले वसनेवरील बंधारे
By Admin | Updated: December 25, 2014 00:02 IST2014-12-24T23:31:20+5:302014-12-25T00:02:45+5:30
पंधरा वर्षांत केवळ दोन बंधारे : आश्वासनांचा पूर जातोय वाहून

निधीअभावी रखडले वसनेवरील बंधारे
पिंपोडे बुद्रुक : सोळशीच्या डोंगर पायथ्याला उगम पावलेली वसना नदी वर्षातील किमान आठ महिने वाहत असते. वर्षानुवर्षे डोळ्यांदेखत पाणी वाहून जात आहे. नदीवर कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची नितांत गरज असूनही गेल्या पंधरा वर्षांत केवळ दोनच बंधारे बांधले गेले आहेत. मात्र, बंधारे मंजूर केल्याच्या आश्वासनांचा अन् भूमिपूजनाचा पूरमात्र वसनेच्या पुरासोबत वाहून गेल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
दहिगाव, ता. कोरेगाव येथे पहिला बंधारा मंजूर करण्यात आला. तो पूर्ण करण्यासाठी पाच-सहा वर्षांचा कालावधी लागता. मात्र, आजही तो बंधारा पूर्ण क्षमतेने पाणी साठवू शकला नाही. जवळपास एक कोटी खर्चून बांधलेला बंधारा निकृष्ट पद्धतीच्या कामामुळे बहुतांश काळ कोरडाच असतो. त्यानंतर सोनके-पिंपोडे बुद्रुक गावच्या हद्दीत दुसरा बंधारा बांधण्यात आला. मात्र, दोन वर्षे झाली तरी त्याला दरवाजेच बसले नव्हते. शेवटी कंटाळून बाजूच्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने त्या बंधाऱ्याला दरवाजे बसवले. मात्र, पायातूनच गळती होत असल्यामुळे तो बंधाराही निरुपयोगी झाला आहे.
घिगेवाडी, पिंपोडे बुद्रुक, वाघोली, सोनके या चार गावांच्या हद्दीत वसना नदीवर पाच बंधारे मंजूर करण्यात आले. मात्र, या कामांना निधी उपलब्ध होऊ शकला नाही. गत लोकसभा निवडणुकांपूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजने उरकण्यात आली; पण अजून तरी तेथील जागेवरून दगडही हलला नाही, हे विशेष.
वसनेचे पाणी कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांद्वारे अडविल्यास परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीपाण्याचा खूप मोठा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे. याकडे राजकीय हेतूने पाहिले जात असून, केवळ श्रेयवादात अशी समाजोपयोगी कामे अडकून पडत आहेत. यावर मात्र कोणी मंथन करताना दिसून येत नाही. जलसंधारणाच्या कामांबाबत शासनाची कितीही सकारात्मक भूमिका असली तरी स्थानिक लोकप्रतिनिधी निधी मिळविण्यात अन् जनरेटा उभा करण्यात कमी पडत असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)
वसना नदीवर पाच बंधारे मंजूर आहेत. साधारणपणे अडीच ते तीन कोटंचा निधीची आवश्यकता आहे. भूमिपूजने होऊनही केवळ निधीअभावी कामे सुरू होऊ शकली नाहीत. मात्र, आमदारांच्या प्रयत्नातून अधिवेशन संपल्यावर यावर सकारात्मक मार्ग काढून कामे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- सतीश धुमाळ, सदस्य, जिल्हा नियोजन मंडळ,