अत्याचारानंतर आरोपी कीर्तनात दंग
By Admin | Updated: July 29, 2016 23:21 IST2016-07-29T22:39:34+5:302016-07-29T23:21:56+5:30
निवांतपणे घरी जेवताना त्याला पोलिसांनी उचलले : आई अन् आजी कामावरून परत येताच भेदरलेल्या बालिकेने फोडला हंबरडा

अत्याचारानंतर आरोपी कीर्तनात दंग
वाठार स्टेशन : पाच वर्षाच्या कोवळया बालिकेवर अत्याचार केल्यानंतर आरोपी गावभर फिरला. तसेच मंदिरातील आरती सोहळ्यातही दंग झाला. ऐवढे भयानक कृत्य करुनही संतोष भोईटे याच्यावर कसलाही परिणाम झालेला नव्हता. रात्री आठ वाजता घरी जाऊन काही न घडल्याच्या अविर्भावात तो जेवत होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
‘अ... अ... आई’ एवढंच काय ते शिकत असलेली एक छोटी चिमुकली गुरुवारी शाळेत न जाता आपल्या आजी सोबत शेतात गेली. दिवसभर शेतात खेळल्या नंतर ती आजी सोबत परतत होती. मात्र, आजी काम करत होती, त्या शेतकऱ्याने या चिमुकलीला आपल्या मोटारसायकलवर बसवून गावाशेजारील वस्तीशेजारी सोडलं. यावेळी आजीची वाट पाहत असलेली ही चिमुकली रस्त्यावरच थांबली होती. मात्र, याचवेळी गावातील एका नराधमाची नजर या चिमुकलीवर पडली. घरात नेहमीच ये-जा करत असलेल्या या नराधमाने चॉकलेटचं आमिष दाखवत घराजवळ आणलं, आणि या चिमुकलीवर अत्याचार करून पळ काढला.
ही मुलगी मात्र या घटनेनंतर रडतच आजी येणाऱ्या रस्त्याकडे धावली. यावेळी आजी आणि बाहेरगावी कामावर गेलेली आई दोघींनाही समोर पाहून तीनं मोठ्यानं हंबरडा फोडला. हंबरडा सुन्न करणारा होता. याच परिस्थितीत या मुलीला घेऊन आजी आणि आई गावातल्या डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनीही चिमुकलीची अवस्था पाहून तिला वाठार स्टेशनमधील आरोग्य केंद्रात पाठविले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात या मुलीची तपासणी पूर्ण झाली. त्यावेळी मुलीवर अत्याचार झाल्याच्या दु:खात आई आणि आजी ही रडू लागल्या. घडलेल्या प्रकारची माहिती तत्काळ वाठार पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनीही मुलीने वर्णन केलेल्या त्या नराधमाचा शोध सुरू झाला. गावात असे चारजण असल्याने अखेर पोलिसांनी मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून एक फोटो तिला दाखवला हा फोटो बघताच हाच तो नराधम हे जाहीर झाले. शोध घेत केवळ अर्ध्याच तासातच नराधमाला पोलिसांनी खाक्या दाखवला. आणि तो पोपटासारखा सारे बोलू लागला. आता या नाराधमाला केवळ फाशीच मिळावी, अशी व्यवस्था या पोलिसांकडुन सुरू आहे. या नराधमाला शिक्षा होईल; पण पीडित मुलीबाबत जे घडलं ते सुन्न करणार होतं. आज या घटनेने संपूर्ण जिल्ह्यालाच रडवलं. प्रत्येकाच्या तोंडी या आरोपी बाबत संताप होता. अशा घटनाबाबत कठोर कारवाई तर झालीच पाहिजे हीच या मागणी सर्वांचीच आहे. गावात गटा-गटाने लोक चर्चा करत होते. ती फक्त आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. त्या कुटुंबाला सहानुभूती देण्यासाठी अनेकजण येतायत. (वार्ताहर)
तृप्ती देसार्इंनी घेतली पीडित कुटुंबाची भेट
सातारा : कोरेगाव तालुक्यातील एका गावात पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना समजताच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हा शासकीय रुग्णालयात येऊन पीडित कुटुंबाची भेट घेऊन अस्ताविकपणे विचारपूस केली.
पीडित मुलगी घाबरलेली असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी व पोलिसांनी तृप्ती देसार्इंना मुलीला भेटू दिले नाही. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या, ‘ही घृणास्पद घटना असून, माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. संबंधित आरोपीला कडक शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी पुरावे गोळा करावेत. हा खटला जलदगती न्यायालयात सुरू करावा. जेणेकरून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल, यासाठी प्रयत्न करावेत. पीडित कुटुंबीयाला शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळण्यासाठीही प्रयत्न करणार आहे,’ असे तृप्ती देसाई यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर आमदार शिशिकांत शिंदे, ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड आदिंनी पीडित कुटुंबाची भेट घेतली.