दुष्काळी भागातील रुसवा संपेना

By Admin | Updated: July 24, 2014 22:09 IST2014-07-24T22:05:45+5:302014-07-24T22:09:26+5:30

बहुतांशी भाग कोरडाच : माण, खंडाळ्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा, फलटणलाही तुरळक

Drought related floods | दुष्काळी भागातील रुसवा संपेना

दुष्काळी भागातील रुसवा संपेना

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू असताना दुष्काळी भागातील पावसाचा रुसवा अद्याप संपलेला नाही. माण आणि खंडाळा तालुक्यांत आतापर्यंत फक्त ८७ मिमी इतकाच पाऊस झालेला आहे. फलटण तालुक्यात तर तुरळक पाऊस पडत असून, दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. तरच खरीप हंगामाच्या आशा आहेत.
दहिवडी : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने धुवाँधार हजेरी लावलेली असताना दुष्काळी माण तालुक्यात गेल्या चोवीस तासांमध्ये अवघ्या सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी आजअखेर केवळ सरासरी ८७ मिमी पाऊस झाला. त्यामुळे खरिपाचा हंगाम धोक्यात आला आहे.
माणमधील चोवीस तासांतील पावसाची आकडेवारी कंसात एकूण दहिवडी ८ (७३), मार्डी ५ (१०५), मलवडी ५ (८८) कुकुडवाड २ (२७), म्हसवड ९८ (१३१), गोंदवले १२ (९४), शिंगणापूर - १० (१०२). यामध्ये सर्वात कमी पाऊस कुकुडवाड सर्कलमध्ये तर सर्वात जास्त म्हसवडमध्ये झाला आहे. गतवर्षी परतीच्या मान्सूनने हजेरी लावल्याने दुष्काळ हटला होता. या जेमतेमच्या पावसावर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिके हाती घेतली होती. यावर्षी संपूर्ण जून महिना कोरडा गेला तर जुलैचा पंधरवडा उलटून गेला असताना माण तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली नाही.
गतवर्षीच्या पावसाने आंधळी धरण ब्रिटिशकालीन राणंद तलावात पाणी साठले होते; मात्र या पाणीसाठ्यामधील पाणी तळ गाठू लागले आहेत. खरीप हंगामात पाऊस झाल्यास धूळ वाफेवर झालेली पेरणी यशस्वी होऊ शकते. माणमधील शेतकरी वर्ग दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील पश्चिम भागातील नद्यांना पाणी वाढू लागले असताना माणमधील माणगंगा नदी अजून कोरडी आहे. माणमध्ये पृथ्वी साखळी बंधारे मोठ्या प्रमाणात बांधून झाले असताना हे बंधारेही अजूनही कोरडे आहेत. पृथ्वी साखळी बंधाऱ्यांच्या माध्यमातून ओढे सरळीकरण व खोलीकरण करण्यात आले असून, पावसाने हजेरी लावल्यास बंधाऱ्यांमध्ये पाणी साठले जाणार आहे.
माण तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पशुधन जोपासले आहे. तालुक्यातील चारा संपुष्टात आला आहे. यामुळे पशुपालक मेटाकुटीला आले आहेत. या पशुपालकांना शेजारच्या तालुक्यातून ऊस खरेदी करून पशुधन वाचवावे लागत आहे. चारानिर्मितीसाठी दमदार पावसाची गरज आहे.
- अनिल जाधव, दहिवडी

Web Title: Drought related floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.