चालक ‘खाकी’त; मालक ‘खादी’तच हवा!
By Admin | Updated: January 20, 2015 00:02 IST2015-01-19T21:35:57+5:302015-01-20T00:02:43+5:30
कऱ्हाडात रिक्षावाल्यांची पंचाईत : गणवेश नसेल तर शंभरची पावती, पोलिसांकडून कारवाईची मोहीम

चालक ‘खाकी’त; मालक ‘खादी’तच हवा!
कऱ्हाड : शहरातील रिक्षाचालक-मालकांसाठी ‘ड्रेसकोड’ ठरवून देण्यात आलाय. चालकासाठी ‘खाकी’ तर मालकाने पांढरा गणवेश परिधान करावा, अशी सूचना पोलिसांनी केलीय; पण आतापर्यंत गणवेश परिधान करण्यास चालढकल करणाऱ्या रिक्षावाल्यांना आता मात्र कारवाईला सामोरं जावं लागतंय. गणवेश नसेल तर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जातेय. प्रत्येकी शंभर रुपयांचा दंड पोलिसांकडून घेतला जातोय. गेल्या दोन महिन्यांपूर्वी अधिकृत व अनधिकृत रिक्षांचा वाद उफाळला. अनधिकृत रिक्षा व्यावसायिक प्रवाशांची पळवापळवी करीत असल्याचा संघटनांचा आरोप होता. तसेच अन्यही काही प्रश्नांवरून रिक्षा संघटना आक्रमक झाल्या. त्यावेळी पोलीस उपाधीक्षक मितेश घट्टे यांनी पुढाकार घेऊन रिक्षा संघटनांची बैठक घेतली. त्या बैठकीत रिक्षा व्यावसायिकांचे प्रश्न समजावून घेण्यात आले. तसेच या प्रश्नांची सोडवणूक करण्यासह रिक्षावाल्यांना शिस्त लागावी, यासाठी उपाधीक्षकांनी काही सूचना केल्या. प्रत्येक रिक्षाचालक व मालकाने गणवेश परिधान करावा, अशी महत्त्वाची सूचना त्यावेळी करण्यात आली होती. संघटनांनीही ती सूचना मान्य केली. नववर्षाच्या मुहूर्तावर हे रिक्षावाल्यांसाठीचे हे नियम अंमलात आणण्याचा निर्णय झाला. रिक्षाचे चालक व मालकांना गणवेश शिवून घेण्यासाठी मुदतही देण्यात आली. मात्र, मुदत संपल्यानंतरही गणवेशाच्या नियमाचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. शहरातील ढेबेवाडीफाटा परिसरात सोमवारी पोलिसांकडून कारवाईची मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी गणवेश नसणाऱ्या चालक, मालकांच्या रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतल्या. त्या शहर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आल्या. प्रत्येकी शंभर रुपये दंड भरण्याची सूचना पोलिसांकडून करण्यात आली. मात्र, कारवाईची माहिती समजताच रिक्षा संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्वरित पोलीस ठाणे गाठले. शंभरहून अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी पोलीस ठाण्यात पोहोचले. इतर मागण्या मान्य होईपर्यंत गणवेशासाठी रिक्षा व्यावसायिकांवर कारवाई करू नये, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी होती. मात्र, पोलिसांनी त्यास नकार दिला. गणवेशासाठी देण्यात आलेली मुदत संपली असल्याने यापुढे कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अखेर रिक्षा संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस उपाधीक्षक मितेश घट्टे यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. मात्र, उपाधीक्षक घट्टे यांनीही नियम पाळण्याबाबत रिक्षा व्यावसायिकांना सूचना केली. नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा उपाधीक्षक घट्टे यांच्याकडून देण्यात आला.
गणवेशाबाबत पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याने शहरातील रिक्षावाल्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. (प्रतिनिधी)
म्हणे, गणवेश शिवायला टाकलाय !
पोलीस उपाधीक्षक मितेश घट्टे, परिवहन अधिकारी चैतन्य कणसे यांच्यासह डिसेंबर महिन्यात रिक्षाचालक, मालकांची बैठक झाली होती. त्यावेळी गणवेश शिवून घेण्यासाठी प्रशासनाकडून रिक्षावाल्यांना मुदत देण्यात आली होती. नववर्षाच्या मुहूर्तावर गणवेशसक्ती करण्याचा निर्णयही त्यावेळी घेण्यात आला होता. मात्र, नवीन वर्ष सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरी गणवेश शिवायला टाकलाय, टेलर बाहेरगावी गेलाय, मुदत वाढवून द्या, अशी कारणे रिक्षाचालक व मालकांकडून पोलिसांना सांगितली जातायत.
गणवेशामुळे रिक्षाचालक व मालकांना जबाबदारीची जाणीव होते. गणवेश सक्तीचाच आहे. सोमवारी वीस रिक्षाचालक, मालकांवर दंडात्मक कारवाई करून प्रत्येकी शंभर रुपयांप्रमाणे दोन हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे.
- अमोल खोंडे,
पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक