खोल दरीत कोसळलेल्या कारचा चालक ‘फोटोसेशन’मुळे वाचला!
By Admin | Updated: June 28, 2014 00:33 IST2014-06-28T00:32:16+5:302014-06-28T00:33:37+5:30
खंडाळा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटातील चौथ्या वळणावर कार दोनशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला.

खोल दरीत कोसळलेल्या कारचा चालक ‘फोटोसेशन’मुळे वाचला!
खंडाळा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटातील चौथ्या वळणावर कार दोनशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. यावेळी ‘फोटो सेशन’साठी थांबलेल्या प्रवाशांमुळे खोल दरीत कोसळूनही प्रवाशाचा जीव वाचला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीपाद प्रसाद सूर्यवंशी (रा. मोर्वे, ता. खंडाळा) हे खंडाळ्याहून साताऱ्याकडे (एमएच ११ ४१८४) मधून निघाले होते. त्यांची गाडी खंबाटकी घाट ओलांडत असताना कारवरील ताबा सुटला. त्यामुळे घाटातील चौथ्या वळणावर कार तब्बल दोनशे फूट दरीत कोसळली. त्याच वेळी दुचाकीस्वार पाठीमागून येत होते. ते घाटात फोटो काढण्यासाठी थांबले.
यावेळी त्यांना ‘वाचवा-वाचवा’ असा आवाज ऐकू आला. त्यांना दरीत कार कोसल्याचे दिसले. त्यानंतर खंडाळा पोलिसांनी घाटात आपत्कालीन संपर्कासाठी लावलेल्या फलकावरील क्रमांकावरून दुचाकीस्वारांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर खंडाळा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी कारचालकाला बाहेर काढून खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांना तातडीने उपचार मिळाल्याने प्राण वाचले.
खंडाळा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)