स्वप्न साकारलं..माळावर बीज अंकुरल
By Admin | Updated: April 9, 2016 00:14 IST2016-04-08T23:14:19+5:302016-04-09T00:14:23+5:30
खंडाळा तालुका : किसन वीर खंडाळाच्या गव्हाणीत मोळी पडल्याने आनंदाला आले भरतें

स्वप्न साकारलं..माळावर बीज अंकुरल
खंडाळा : थोडथोडकी नव्हे तर २१ वर्षांच्या खडतर तपश्चर्येतून साकारणारा स्वप्नपूर्तीचा प्रसंग डोळ्यात साठवण्यासाठी हजारो पावलं म्हावशीच्या माळाच्या दिशेने येत होती. कारखाना होणारच नाही, असे टीकेचे, उपहासाचे आणि प्रसंगी प्रचंड विरोधाचे घाव सोसून जणू दगडाचा देव आणि मातीची मूर्ती कशी झाली, हे पाहण्याची उत्सुकता त्या हजारो डोळ्यांत होती. आणि तो क्षण आला. गव्हाणीत उसाची मोळी पडली आणि उपस्थित हजारोंच्या मनातलं स्वप्न सत्यात साकारल्याचा, माळावर हिरवं बीज अंकुरल्याचा आनंद झाला.
किसन वीर खंडाळा सहकारी साखर उद्योगाच्या गळित चाचणी हंगाम शुभारंभावेळी आनंद, अभिमान आणि कष्टाचं चीज झाल्याच्या भावनेतून आनंदाश्रूंनी पाणावलेले डोळे अशा संयुक्त भावनांचा कल्लोळच दाटून आल्याचे दिसून आले.
चाचणी गळित हंगामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व त्यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा मुदगल यांच्या हस्ते झाला. जिल्हाधिकारी मुदगल म्हणाले, ‘संपूर्ण साखर कारखानदारीत पहिल्या टॉप टेनमध्ये किसन वीर कारखान्याचा समावेश आहे. संबंधित विभागाकडून माहिती घेऊनच मी हे सांगत आहे. किसन वीर उद्योग समूह सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचावण्यात मोलाचे योगदान देत आहे. त्या प्रयत्नातून उभारण्यात आलेला किसन वीर खंडाळा सहकारी साखर उद्योग खंडाळ्यातील शेतकऱ्यांच्या जीवनाला नवे आर्थिक वळण देणारा ठरेल. सहकारी साखर कारखानादारीतून कायापालट करून दाखवण्याची किमया ज्या कारखान्यांनी केली. त्यामध्ये किसन वीर उद्योग समूह अग्रभागी असून, या कारखान्याच्या माध्यमातून खंडाळ्याच्या आर्थिक परिवर्तनाला प्रारंभ झाला आहे.’
मदन भोसले म्हणाले, ‘कारखाना उभारताना प्रचंड अडचणी होत्या; मात्र आपण जे काम करतोय, ते सर्वसामान्य जनतेसाठी करतोय ही भावना मनात होती. त्याच जोरावर हा टप्पा गाठला आहे. भागीदारी तत्त्वावर उभारण्यात आलेला सहकारी साखर कारखानदारीतला हा कारखाना देशाच्या आणि राज्याच्या सहकारातील पहिलं उदाहरण आहे. सध्या साखर कारखानदारीतील खासगीकरणाचे वारे पाहता सहकारातून उभारलेला हा कदाचित अखेरचा कारखाना ठरेल.’
संचालक धनाजी डेरे व त्यांच्या पत्नी शालन डेरे यांच्या हस्ते गव्हाणीची पूजा झाली. अध्यक्ष मदन भोसले, डॉ. नीलिमा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, प्रादेशिक सह संचालक (साखर) एस. पी. घोरपडे, सेंट्रल एक्साईज सातारा विभागाचे असिस्टंट कमिशनर बी. आर. नवले, महावितरणचे अधीक्षक अभियंता एस. एल. गणेशकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
घरची साथ.. जिल्हाधिकाऱ्यांचा हात...
किसन वीर उद्योग समूहाचे प्रमुख मदन भोसले यांनी आपल्या भाषणात सर्वांच्या सहकार्याचा उल्लेख करत असताना पत्नी नीलिमा भोसले यांच्याकडे पाहत घरातून भक्कम पाठिंबा मिळाल्यानेच आपण धाडसाने काम करत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांना क्षणभर भरूनही आलं होतं.
जिल्हाधिकारी मुदगल यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी किसन वीरचा गळित हंगाम शुभारंभ झाला होता त्यावर्षी विक्रमी गाळप झालं होतं. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा हात लाभदायी असल्याचेही त्यांनी सांगून खंडाळ्यातील विविध उद्योगासाठी कुशल कर्मचारी तयार करणारी संस्था या परिसरात उभारण्यास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांना केले.