Dr. Sally Supekar: Ragarini, who samples two suspects in the district | corona virus -देशसेवा करायला हातात बंदूकच लागते असे नाही : डॉ. सायली सुपेकर

corona virus -देशसेवा करायला हातात बंदूकच लागते असे नाही : डॉ. सायली सुपेकर

ठळक मुद्देजिल्ह्यात दोघा संशयितांचे नमुने घेणारी रगरागिणीकोण म्हणतं हातात बंदुक घेवून देशसेवा केली जातेय?

प्रगती जाधव-पाटील

सातारा :देशसेवा करायला हातात बंदूकच लागते असे नाही, आपणही यात आपले योगदान देऊ शकतो, असा स्वानुभव क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सायली सुपेकर यांनी व्यक्त केला.

कधी नव्हे ते एखाद्या विषाणूचा इतका धोका सर्वत्र जाणवत असताना आपण सुरक्षित राहणं मला पटलंच नाही. शासकीय रुग्णालयात यासाठी काम करण्याच्या मिळालेल्या संधीचं सोनं करणं सोडून त्याची भीती काय बाळगायची? त्यामुळे दाखल झालेल्या दोन्ही संशयित रुग्णांचे नमुने घेताना कसलाच ताण जाणवला नाही.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे दोन संशयित आढळले. या दोघांच्या थुंकी आणि घशातील स्त्रावांचा नमुना डॉ. सुपेकर यांनी घेतला. यातील एका रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर दुसऱ्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. साताऱ्यात हा कक्ष स्थापन झाल्यापासून याची जबाबदारी सक्षमपणे डॉ. सुपेकर यांनी सांभाळली आहे.

रोज सकाळी जिल्ह्याचा आढावा घेणं, त्याचा अहवाल शासकीय स्तरांवर भरणं हे नियमित काम करत असतानाच साताऱ्यांत दोन संशयित दाखल झाले. सातारकरांनी आवश्यक काळजी घेतली तर भविष्यात कोणीही संशयित येथे आढळणार नाही, असा विश्वास त्यांना आहे.

दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येकाला याबाबत आवश्यक त्या सूचना देणं, संशयित रुग्णांना औषधे द्यायला जाणारे वैद्यकीय कर्मचारीही मास्क लावून तीन फूट अंतरावर उभे राहून हे काम करत आहेत.

जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी अनेक प्रकारचे रुग्ण येथे येत असतात. त्यांना आवश्यक औषधोपचार दिल्यानंतर कोरोनाबाबत काळजी घेण्याच्या सूचनाही रुग्णालयात देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या कक्षातील कोणीही वैद्यकीय किंवा अन्य कोणत्याही कारणांनी रजा घेतलेली नाही. सकाळी बरोबर दहा वाजता येणारे कर्मचारी रात्री आठ वाजेपर्यंत काम संपवूनच मग घरी जात आहेत.

कीट परिधान करणाऱ्या पहिल्या अन् एकमेव

कोरोना संशयित रुग्णांचे नमुने घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात ३५ हून अधिक कीट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांच्या आदेशानुसार आणण्यात आले आहे. हे कीट घातल्याशिवाय नमुने घ्यायला जाताच येत नाही.

कॅप, ग्लोव्हज, मास्क, चष्मा, फूटवेअर, गाऊन परिधान करणारी जिल्ह्यात डॉ. सायली सुपेकर पहिल्या आणि एकमेव वैद्यकीय तज्ज्ञ आहेत. हे कीट परिधान केल्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञ असल्याचा सार्थ अभिमान वाटल्याचेही त्यांनी लोकमतशी बोलताना नमूद केले.


वैद्यकीय क्षेत्रात अशा पद्धतीचे आव्हान अभावानेच अनुभवायला मिळते. कोरोनाच्या निमित्ताने एका मोठ्या संकटावर मात करण्याच्या टीममध्ये मी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या लेखी ही देशसेवा आहे. सातारकर, जिल्हा प्रशासन आणि कुटुंबीयांच्या खंबीर पाठिंब्यामुळे हे काम करताना मला नक्कीच खूप विशेष वाटतंय.
-डॉ. सायली सुपेकर,
वैद्यकीय अधिकारी, सातारा


सगळ्यांनाच काळजी

वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावताना संसर्गामुळे निर्माण होणारी परिस्थिती असा प्रसंग अगदी अभावानेच येतो. त्यामुळे या विभागात कार्यरत असलेल्या प्रत्येकाविषयी जिल्हा रुग्णालयात भावनिक कप्पा तयार झाला आहे.

यातूनच विविध विभागांमध्ये कार्यरत असणारे अधिकारी कर्मचारी यांच्यासह रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकही या अधिकाऱ्यांची विशेष काळजी घेत असल्याचे चित्र पाहायला मिळते. रात्री उशिरा थांबणाऱ्यांच्या जेवणाचीही विचारपूस केली जाते, हे विशेष. कोरोनाचा विस्तार रोखण्यासाठी शासनाने सर्वच शाळा बंद ठेवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कर्मचारी रुग्णालयात आणि मुलं घरी अशी परिस्थिती सर्वत्र दिसत आहे.

 

Web Title: Dr. Sally Supekar: Ragarini, who samples two suspects in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.