बेवारस गाड्यांनी दिली दुप्पट कमाई!
By Admin | Updated: April 14, 2015 00:37 IST2015-04-14T00:37:34+5:302015-04-14T00:37:34+5:30
पन्नास दुचाकींचा लिलाव : शहर पोलीस ठाण्याकडील आणखी ४५ गाड्यांच्या विक्रीचा दुसरा टप्पा लवकरच

बेवारस गाड्यांनी दिली दुप्पट कमाई!
सातारा : शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात असलेल्या बेवारस दुचाकींच्या लिलावाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या टप्प्यात पन्नास गाड्यांची विक्री करण्यात आली. या दुचाकींनी मूल्यांकनापेक्षा दुप्पट रक्कम सरकारच्या तिजोरीत टाकली आहे. आणखी ४५ बेवारस गाड्यांच्या लिलावाचा दुसरा टप्पा येत्या काही दिवसांत होणार असून, ‘सेकंड हँड’ गाडी घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही पर्वणीच ठरली आहे.
गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या किंवा बेवारस स्थितीत आढळलेल्या शेकडो गाड्या वर्षानुवर्षे शहर पोलिसांच्या ताब्यात धूळ खात पडल्या होत्या. निरीक्षक राजीव मुठाणे यांनी या दुचाकींच्या लिलावाच्या प्रक्रियेस गती दिली. यापूर्वीही असे प्रयत्न झाले होते; मात्र लिलावप्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. ही प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने प्रत्यक्ष लिलाव होण्याच्या मार्गात अनेक अडथळे होते. परंतु अखेर ५१ मोटारसायकलींचा प्रत्यक्ष लिलाव होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यातील एका मोटारसायकलला ही प्रक्रिया सुरू असताना ‘वारस’ सापडला. उर्वरित ५० गाड्यांची लिलावप्रक्रिया पूर्ण झाली आहे.
या पन्नास गाड्यांचे मूल्यांकन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले. हे मूल्य १ लाख ६ हजार एवढे होते. प्रत्यक्ष लिलावात या दुचाकींनी २ लाख ३८ हजार ८०० रुपयांची म्हणजे उद्दिष्टाच्या दुप्पट कमाई केली. गाडीच्या स्थितीनुसार कमीत कमी किंमत ५ हजार तर जास्तीत जास्त किंमत १२ हजारांच्या घरात गेली. सरकारी तिजोरीत पैसे जमा होण्याबरोबरच पोलीस ठाण्याच्या आवारातील बरीच जागा रिकामी झाली. आता यापुढील टप्प्यात ४५ गाड्यांचा लिलाव प्रस्तावित असून, ही प्रक्रिया येत्या पंधरवड्यात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे दुचाकी घेऊ इच्छिणारे; पण ‘बजेट’ कमी असणारे आणखी ४५ सातारकर भाग्यवान ठरणार आहेत. नुकत्याच पूर्ण झालेल्या लिलावप्रक्रियेचीही अनेकजण आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे लिलाव जाहीर होताच बोली लावणाऱ्यांनी हात सैल सोडले आणि पोलिसांची दुप्पट उद्दिष्टपूर्ती झाली. (प्रतिनिधी)
अशी आहे क्लिष्ट प्रक्रिया
बेवारस गाड्या धूळ खात पडून राहण्याऐवजी लगेच लिलावात का काढत नाहीत, असा सर्वसामान्यांना नेहमी प्रश्न पडतो; मात्र बेवारस गाड्यांची विक्री करण्याची प्रक्रिया म्हणजे द्रविडी प्राणायाम आहे. प्रथम गाड्या ज्या-ज्या कंपन्यांनी तयार केल्या, त्या सर्व कंपन्यांना तसे कळवावे लागते. नंतर सर्व विमा कंपन्यांना माहिती द्यावी लागते. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या संमतीने आरटीओ कार्यालयाकडून गाड्यांचे मूल्यमापन करून घेतले जाते. नंतर तहसीलदारांची लेखी संमती घेऊन लिलावप्रक्रिया सुरू होते. संबंधित गाड्यांची माहिती प्रसिद्ध करून ‘वारसदार असल्यास दावा करावा,’ असे कळविले जाते. विशिष्ट मुदतीत ज्या गाड्यांवर दावा केला जात नाही, त्यांचा लिलाव केला जातो.