वाठार पोलीस चौकीचे दार अखेर उघडले
By Admin | Updated: July 8, 2015 21:55 IST2015-07-08T21:55:20+5:302015-07-08T21:55:20+5:30
‘लोकमत’च्या वृत्तानंतर कर्मचाऱ्यांची नेमणूक

वाठार पोलीस चौकीचे दार अखेर उघडले
वाठारस्टेशन : सातारा-लोणंद मार्गावर आदर्की फाटा येथे वाठार पोलीस ठाण्याअंतर्गत उभारलेली पोलीस चौकीची दुरवस्था झाली होती. कायमस्वरूपी बंद असणाऱ्या या चौकीचा वापर पोलिसांपेक्षा मद्यपी व भंगार गोळा करणारेच अधिक प्रमाणात करत असल्याने ही बंद चौकी कधी उघडणार, याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच दुसऱ्याच दिवशी सहायक पोलीस निरीक्षक निकम यांनी या चौकीची डागडुजी करून या चौकीसाठी दोन कर्मचाऱ्यांच्या नेमणूक केली.
सातारा-लोणंद राज्य मार्गावर लोणंदकडून साताऱ्याकडे येत असताना सालपे घाट तसेच फलटणकडून आदर्कीमार्गे साताऱ्याकडे येताना हणमंतवाडी घाटात रात्रीच्या वेळी लूटमारीच्या घटना घडत होत्या. यासाठी या दोन्ही घाटमाथ्यांच्या मधोमध पोलीसचौकी उभारावी, अशी वाहतूकदार, प्रवाशांची मागणी होती. पोलीस चौकीची उभारणी करण्यात आली होती. (वार्ताहर)
ग्रामस्थांकडून ‘लोकमत’चे आभार
४अनेकदा मागणी करूनही पोलीस यंत्रणा या गोष्टीकडे डोळेझाक करीत होती. आता लोणंदमधील पालखी बंदोबस्तासाठी या पोलीस चौकीचा वापर गरजेचा असल्याने पोलिसांनी ही चौकी सुरू करावी, यासाठी ‘लोकमत’ने आवाज उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून ही चौकी आता पुन्हा कार्यरत राहणार आहे. यामुळे या मार्गावरील प्रवास आता सुरक्षित होणार आहे. ‘लोकमत’च्या भूमिकेचे ग्रामस्थ, प्रवासी व वाहनचालकांमधून स्वागत होत आहे.
वाठार पोलीस ठाण्याअंतर्गत आदर्की फाटा या ठिकाणी असलेल्या पोलीस दूरक्षेत्राची स्वछता करण्यात आली असून, दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे ही चौकी यापुढे कायमस्वरूपी कार्यरत राहणार आहे.
- एस. ए. निकम,
सहायक पोलीस उपनिरीक्षक,
वाठार पोलीस स्टेशन