ज्ञानेश्वर महाराज रोप तर निवृत्तीनाथ बीज..!
By Admin | Updated: January 20, 2015 23:34 IST2015-01-20T22:26:15+5:302015-01-20T23:34:12+5:30
यशवंत महोत्सव : प्रीतिसंगमावर भरतोय संतांचा मेळा

ज्ञानेश्वर महाराज रोप तर निवृत्तीनाथ बीज..!
कऱ्हाड : ‘वारकरी सांप्रदायाला खूप मोठी परंपंरा आहे. आज त्याचा वटवृक्ष पहायला मिळतो. त्याचे रोप संत ज्ञानेश्वर महाराज असले तरी बीज मात्र संत निवृत्तीनाथ आहेत हे विसरून चालणार नाही, ’ असे निरूपन ह. भ. प. भगवती महाराज-सातारकर यांनी केले.येथील कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर यशवंत सहकारी बँकेच्यावतिने ‘यशवंत महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी भगवती महाराजांनी किर्तनाचे दुसरे पुष्प गुंफले. त्यावेळी ‘इवलेसे रोप, लावियेले द्वारी’या अभंगाचे त्यांनी निरूपण केले. यशवंत बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.भगवती महाराज म्हणाल्या, ज्ञानदेवांनी पसायदान मागितले. निरपेक्ष भावनेने मागितलेले ते जगातील एकमेव दान आहे. जगातील तत्वज्ञानांपैकी सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान म्हणून पसायदानाची ओळख आहे. त्याचा विसर आम्हाला पडून उपयोग नाही. संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ‘आदिनाथ गुरू सकळ सिध्दांत’असे जरी असले तरी ज्ञानेश्वरांचे कार्य महान आहे. निवृत्ती नाथांनी तर संत ज्ञानेश्वरांच्या रूपाने वांड्मयच निर्माण केले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मुक्ताबाईही ज्ञानेश्वरांच्या गुरूच होत्या. वारकरी सांप्रदायाच्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराज सर्वश्रेष्ठ योगी होते. त्यांना सदगुरूंचा आर्शिवाद मिळाल्याने ते माऊली झाले. (प्रतिनिधी)
याचाही वटवृक्ष होईल...
‘इवलेसे रोप लादियेले द्वारी’या अभंगाचा धागा पकडून भगवती महाराजांनी ‘यशवंत’बँकेच्या रूपाने लावलेल्या रोपाचाही वटवृक्ष होईल. ‘यशवंत महोत्सव’त्याला ते बळ देईल असा विश्वास व्यक्त केला.
कऱ्हाडला सांस्कृतीक वारसा मोठया प्रमाणावर आहे. तो वारसा पुढची पिढी जतन करताना दिसतेय. सुश्राव्य किर्तन श्रवण करण्यासाठी हजारोंची हजेरी गुलाबी थंडीतही पहायला मिळतेय. किर्तनाच्या प्रारंभी ‘सुंदर ते ध्यान,उभे विठेवरी हा अभंग भगवती महाराज यांनी मधुर आवाजात गायला. त्याला बाळकृष्ण गायकवाड महाराजांनी सुरेल साथ दिली.