जिल्हा बँकेचे मतदार निघाले पर्यटनाला; ‘अर्ज मागे’चा भोपळा

By Admin | Updated: April 15, 2015 23:59 IST2015-04-15T23:48:19+5:302015-04-15T23:59:24+5:30

--सांगा डीसीसी कोणाची?

District bank voters leave tourism; Pumpkin of application back | जिल्हा बँकेचे मतदार निघाले पर्यटनाला; ‘अर्ज मागे’चा भोपळा

जिल्हा बँकेचे मतदार निघाले पर्यटनाला; ‘अर्ज मागे’चा भोपळा

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काही ठिकाणी संघर्ष अटळ असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागल्याने मतदारांना खूश ठेवण्याच्या असंख्य क्लृप्त्या वापरल्या जाऊ लागल्या आहेत. जिल्ह्यातील वजनदार नेते मंडळींनी आपल्या मतदारांना ‘कन्याकुमारी अन् तिरुपती’सह दक्षिण भारताच्या पर्यटनाला धाडल्याची जोरदार चर्चा आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत कऱ्हाड, पाटण, माण व जावळी तालुका सोसायटी मतदारसंघांत संघर्ष अटळ असल्याचे चित्र समोर येत आहे. नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातही जोरदार चढाओढ असून, याठिकाणीही रंगतदार लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अवघ्या २१ जागांसाठी १२८ उमेदवारांचे २०३ अर्ज छाननीत वैध ठरले असून, अर्ज मागे घेण्याच्या पाचव्या दिवशीसुद्धा एकही अर्ज मागे घेतला गेला नाही.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अद्याप आठ दिवसांची मुदत असल्याने मिळालेल्या कालावधीत हात ओले करून घेण्याचे प्रयत्न अनेकांनी सुरू केले आहेत. ‘इच्छा माझी पुरी करा,’ असाही हेका काही जणांनी लावून धरल्याने निवडणुकीसाठी उभ्या असणाऱ्या ‘वजनदार’ असामींना नाइलाजानं खर्च करून त्यांना पर्यटनाला पाठवावे लागले आहे.
जावळी-कोरेगावातील काही मंडळी लांब दौऱ्यावर गेल्याची खबरबात आहे. या दौऱ्यात केवळ अंगावरील कपड्यानिशी यायचे, बाकी सर्व काही आधीच नियोजनबद्ध केलेले आहे, असे सांगण्यात आल्याने पर्यटनाला गेलेल्यांची चांदी झाली आहे. त्यांच्या या दौऱ्याची बातमी समजलेले सामान्य सभासद मात्र त्यांचा हेवा करताना पाहायला मिळत आहेत. जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली राष्ट्रवादीअंतर्गत सुरू आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना निवडणूक बिनविरोध करण्याच्या सूचना केल्या आहेत. अर्ज मागे घेतले जातील; मात्र त्यासाठी २२ तारीख उजाडावी लागेल. या निवडणुकीत मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले असले, तरी जास्त जागा बिनविरोध होतील, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)


आमदारांवर जबाबदाऱ्या
जिल्हा बँक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे पक्षाच्या आमदारांवर मतदारसंघनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचा आदेश शिरोधार्य मानून आमदारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून, त्या-त्या मतदारसंघात ठिय्या मांडला आहे.
...


खंडाळा विश्रामगृहावर अजित पवारांची बैठक
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने खंडाळा तालुक्यातील दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी विश्रामगृहावर गुप्त बैठक घेऊन जिल्हा बँक बिनविरोध करण्याच्या सूचना केल्याची माहिती आहे. या बैठकीला रामराजे नाईक-निंबाळकर, आ. मकरंद पाटीलही
उपस्थित होते.



जावळीतले ३४ मतदार गायब
जावळी विकास सेवा सोसायटी मतदारसंघातील ३४ मतदार अचानकपणे गायब झाले आहेत. ही सर्व मंडळी दौऱ्यावर गेल्याची तालुक्यात चर्चा आहे; परंतु नेमक्या कुठल्या पर्यटनस्थळी ही मंडळी गेली आहेत, याचा शोध अनेकजण घेत आहेत.

Web Title: District bank voters leave tourism; Pumpkin of application back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.