सातारच्या चाळकेवाडी पठारात नवीन गेको प्रजातीचा शोध, पालीला इंडोनेशियातील प्रसिद्ध संशोधकाचे नाव
By प्रगती पाटील | Updated: February 5, 2025 16:34 IST2025-02-05T16:34:06+5:302025-02-05T16:34:20+5:30
जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आशेचा किरण

सातारच्या चाळकेवाडी पठारात नवीन गेको प्रजातीचा शोध, पालीला इंडोनेशियातील प्रसिद्ध संशोधकाचे नाव
सातारा : सातारच्या चाळकेवाडी पठारावर गेको या पालीच्या प्रजातीचा शोध लागला आहे. हा शोध जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या नवीन प्रजातीच्या शोधामुळे महाराष्ट्रातील पठारावरील परिसंस्थेचे महत्त्व अधोरेखित होते. ही नवीन प्रजाती पाल स्थानिक, दुर्मीळ आणि संकटग्रस्त प्रजातींसोबत या पठारावर आढळते.
चाळकेवाडी पठार हे बिबट आणि अस्वलांसाठी येण्या जाण्याचा मार्ग असून, स्थलांतरित पक्ष्यांसाठी आणि शिकारी पक्ष्यांसाठी आश्रयस्थान म्हणून महत्त्वाची भूमिका बजावते. ही पाल स्थानिक परिसंस्थेच्या संतुलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. कीटकभक्षक म्हणून ती मच्छर, कोळी आणि अन्य किटकांचे प्रमाण नियंत्रित ठेवते, ज्यामुळे पर्यावरण निरोगी राहते. याशिवाय, ही पाल शिकारी पक्षी, साप आणि लहान सस्तन प्राण्यांसाठी खाद्यसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या अस्तित्वामुळे स्थानिक जैवविविधतेचे अस्तित्व टिकून राहते, म्हणूनच हा शोध जैवविविधता संवर्धनासाठी खूप महत्त्वाचा आहे.
इंडोनेशियातील प्रसिद्ध संशोधकाचे नाव
या नवीन पालीच्या प्रजातीला इंडोनेशियातील प्रसिद्ध संशोधक डॉ. थसुन अमरसिंघे यांचे नाव देण्यात आले आहे. हे नाव त्यांच्या वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा सन्मान म्हणून देण्यात आले आहे. हा शोध पाच वर्षांच्या अथक संशोधनाचा परिणाम असून, भारतीय वन्यजीव शास्त्रज्ञ डॉ. अमित सय्यद, राहुल खोत आणि जयदित्य पुरकायस्थ यांनी केलेल्या मेहनतीचे फळ आहे. हे संशोधन झुटाक्सा (Zootaxa) या न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित शास्त्रीय नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.
चाळकेवाडी पठाराचा जैवविविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेतले तरी, वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे येथील परिसंस्था धोक्यात येत आहे. चाळकेवाडी पठार हे बहुतांश खासगी मालकीचे असून, येथे वाढता पर्यटकांचा प्रवाह, व्यावसायिक उलाढाल, मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी, लाल मातीसाठी उत्खनन, पठारावरील खडकांचे वाहतूक आणि पर्यटक वाहने यामुळे येथील नैसर्गिक अधिवासाचा नाश होत आहे. परिणामी, अनेक स्थानिक प्रजातींना विलुप्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. - डाॅ. अमित सय्यद, संशोधक