‘कोयना’च्या नदी विमोचकातून पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST2021-04-06T04:38:05+5:302021-04-06T04:38:05+5:30
कोयनानगर : राज्यात उन्हाची तीव्रता वाढत असून कृष्णा नदीत पाण्याचा तुटवडा भासू लागल्याने सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार शनिवारपासून ...

‘कोयना’च्या नदी विमोचकातून पाण्याचा विसर्ग
कोयनानगर : राज्यात उन्हाची तीव्रता वाढत असून कृष्णा नदीत पाण्याचा तुटवडा भासू लागल्याने सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार शनिवारपासून कोयना धरणाच्या नदी विमोचकातून १ हजार ३५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रात एकूण ३ हजार ४५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गत काही दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी पाण्याची टंचाई भासत आहे. कृष्णा नदीवरील टेंभु, ताकारी, म्हैसाळ उपसा जलसिंचन योजना व इतर बंधाऱ्याला पाण्याची कमतरता जाणवू लागल्याने सांगली पाटबंधारे विभागाने कोयना धरणातून वाढीव पाण्याची मागणी केली. त्यामुळे शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता कोयना धरणाचे नदी विमोचक साडेतीन फुटाने उघडून अतिरिक्त १ हजार ३५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तर नियमित सुरू असलेला पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग असा एकूण ३ हजार ४५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात चालू आहे. नदी विमोचकातील पाण्याचा विसर्ग हा साधारण पंधरा दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.
- चौकट
उंची सात तर रुंदी चार फुट
कोयना धरणाच्या भिंतीच्या पायथ्याला आपत्कालीन पाणी विसर्गासाठी नदी विमोचक असून त्याची उंची सात फूट व रुंदी चार फूट आहे. पायथा वीजगृहातील पाण्याच्या विसर्गापेक्षा अतिरिक्त विसर्गाची गरज भासल्यास नदी विमोचकातून विसर्ग सुरू केला जातो.
फोटो : ०५केआरडी०२
कॅप्शन : कोयना धरणाच्या नदी विमोचकातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.