कोयना वगळता इतर धरणांतील विसर्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST2021-08-14T04:44:10+5:302021-08-14T04:44:10+5:30

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यापासून तुरळक स्वरुपात पाऊस होत असून, शुक्रवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ३१ मिलीमीटरची नोंद ...

Discharge from other dams except Koyna | कोयना वगळता इतर धरणांतील विसर्ग बंद

कोयना वगळता इतर धरणांतील विसर्ग बंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यापासून तुरळक स्वरुपात पाऊस होत असून, शुक्रवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ३१ मिलीमीटरची नोंद झाली. तर पाऊस कमी झाल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. परिणामी कोयना वगळता इतर प्रमुख धरणांतील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन आठवड्यापूर्वी धुवांधार पाऊस झाला होता. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागात तर तुफान वृष्टी झाली. यामुळे शेतीचे नुकसान झाले. तसेच रस्ते, पूल वाहून गेले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक आली. कोयना धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाण्याची आवक झाली. कोयना धरणाच्या इतिहासातील हा एक विक्रम ठरला. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत कोयना धरणातील पाणीसाठा ९० टीएमसीच्यावर पोहोचला होता. तर कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी या सारख्या धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणी आले. सध्या पश्चिम भागात पाऊस कमी झाल्याने धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे कोयना वगळता अन्य धरणांतून विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा ११ मिलीमीटर पाऊस झाला. तर जूनपासून आतापर्यंत ३४४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजा येथे १५ व यावर्षी आतापर्यंत ४४०३ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरला सकाळपर्यंत ३१ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. तर जूनपासून महाबळेश्वरला ४५११ मिलीमीटर पर्जन्यमान नोंद झालेले आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात ९०.८८ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणांत २१०० क्युसेक पाणी येत होते. धरणाचे सर्व दरवाजे बंद बसून फक्त पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

चौकट :

कोयना धरणात ८६ टक्के पाणीसाठा...

जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची दडी कायम आहे. तर पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावलेली आहे. त्यामुळे धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी या प्रमुख धरणांतील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. तर सध्या धोम धरणात ८३ टक्क्यांच्यावर पाणीसाठा आहे. कण्हेर धरणात ८४.२७, कोयना ८६.३६, उरमोडी ८१.८३, बलकवडी ८६.४६ आणि तारळी धरणामध्ये ८८.१० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

.......................................................

Web Title: Discharge from other dams except Koyna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.