Dirt roads uneven breathing! | धुळीने माखलेले रस्ते अन गुदमरलेले श्वास!, कॉलन्या ओसाड
धुळीने माखलेले रस्ते अन गुदमरलेले श्वास!, कॉलन्या ओसाड

ठळक मुद्देधुळीने माखलेले रस्ते अन गुदमरलेले श्वास!, कॉलन्या ओसाड पावसाळ्यात राहते पाणी साठून ; आजारांना मिळते निमंत्रण

सागर गुजर

सातारा : शाहूनगरमधील त्रिशंकू भागात सहज जरी फेरफटका मारला तरी धुळीने माखलेले रस्ते पहायला मिळतात. मोठे वाहन रस्त्यावरुन गेल्यास सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन ही रस्त्याकडेच्या घरांमध्ये जाते. परिसरातील घरांच्या भींती रंगीत असल्या तरी त्या धुळीने माखल्याचे पहायला मिळते. या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे श्वासही या धुळीने गुदमरत आहेत.

चार भिंतीपासून गोळीबार मैदानापर्यंत दक्षिण दिशेला तब्बल ५ किलो मीटर अंतराच्या परिघात पसरलेला त्रिशंकू परिसर मूलभूत सुविधांपासू कोसोदूर आहे. मुख्य रस्ते पूर्वी झाले असले तरी त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य साठलेले आहे. हे खड्डेही भरुन घेतले जात नाहीत. तर कॉलनींमधील रस्त्यांवर वर्षानुवर्षे धुळीचे साम्राज्य साठलेले आहे. या रस्त्यांवर डांबरीकरणाचे कामच होत नाही.

पाणी वाहून जाण्याची व्यवस्थाही या परिसरात केली गेलेली नसल्याने ड्रेनेजचे पाणी मोकळ्या प्लॉटमध्येच साठलेले असते. या साठलेल्या पाण्यावर डासांची निर्मिती होऊन परिसरात साथीचे आजार पसरतात. काही दिवसांपूर्वी येथील झुंजार कॉलनीमध्ये डेंग्यू साथीने थैमान घातले होते. १५0 रुग्ण डेंग्यूमुळे व्याधीग्रस्त झाले.

या भागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. याची तक्रार केली तर दखल घेतली जात नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. आझाद नगर चौक, शिवनेरी कॉलनी, माधुरी कॉलनी, जगतापवाडी या परिसरात गटारांची व्यवस्था नसल्याने लोकांचे हाल होत आहेत. साथीचे आजार वेगाने पसरत असतात.

या परिरात नेहमीच धूळ पसरत असल्याने लोकांचा श्वास गुदमरतोय. या धुळीमुळे रस्त्याकडेच्या खिडक्या कायमस्वरुपी बंद ठेवण्याची वेळ लोकांवर आली आहे. या कॉलन्यांमधील घरांच्या खिडक्या कायमच बंद दिसतात. अनेक घरांच्या कंपाऊंड भिंतीच्याही वर धुळीपासून संरक्षणासाठी कापड लावल्यात आल्याचे पाहायला मिळते.

या धुळीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे आजार जडू लागले आहेत. लहान मुलांचेही श्वास या धुळीमुळे गुदमरतो आहे. उन्हाळा आणि हिवाळ्यात धुळीचा त्रास तर पावसाळ्यात रस्त्यावर तुडुंब भरलेले पाणी या ठिकाणी कायमच पाहायला मिळते.

मागील पावसाळ्यात त्रिशंकू भागातील सर्वच कॉलन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. या गढूळ पाण्यातूनच लोकांना ये-जा करायला लागली. शाळकरी विद्यार्थी, महिला यांना तर जीव मुठीत घेऊनच या रस्त्यांवरुन जावे लागले. अनेक वाहनधारक या रस्त्यांवर पडत होते. दरम्यान, या रस्त्यांचे डांबरीकरण हाती घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.

मोकळे प्लॉट चिखलमय
कॉलनींमधील ड्रेनेजचे पाणी मोकळ्या प्लॉटमध्ये साठलेले पहायला मिळते. यामुळे परिसरात चिखल तर होतोच त्याबरोबरच दुर्गंधीही पसरते. डासांची निर्मितीही होते. त्यामुळे परिसरात साथीचे आजार पसरत आहेत.
 


येथील झुंजार कॉलनीत काही दिवसांपासून डेंग्यूने थैमान घातले होते. तब्बल १५0 रुग्ण डेंग्यूग्रस्त आढळून आले होते. त्यांनी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करुन घेतले. ओढे तुंबले असल्याने डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
- संतोष घाडगे, झुंजार कॉलनी


गोळीबार मैदान परिसरात अद्यापही स्ट्रीट लाईट पोहोचलेली नाही. शासनाने आमच्यावर बहिष्कार टाकलाय का?, अशी आमच्या स्थानिक जनतेची समज झलेली आहे.
- गणेश खुडे,
गोळीबार मैदानत्रिशंकू भागात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. हा कचरा उचलला जात नाही. दुर्गंधी पसरते तरीही त्याकडे शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करते. अनेकदा स्थानिक लोक एकत्र येऊन ही घाण उचलतात.
- विजय पवार,
अश्विनी सोसायटी

Web Title: Dirt roads uneven breathing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.