सातारा : विधानसभा निवडणुकीतील मारहाणीच्या वादातून धीरज ढाणे यांचा खून करण्याची सुपारी दिल्याप्रकरणी काही संशयितांना अटक झाली असून त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच तपासादरम्यान कास मार्गावरील यवतेश्वर परिसरात संशयितांनी गोळीबाराचा सराव केल्याचेही समोर आले आहे, अशी माहिती सातारा शहर पोलिसांनी दिली.पोलिसांच्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत माजी नगराध्यक्षा मुक्ता लेवे यांची पती वसंत लेवे (रा. सातारा) यांना मारहाण झाली होती. याचा राग मनात धरून धीरज ढाणे (रा. मंगळवार पेठ, सातारा) यांचा गेम करायचा होता. यासाठी वसंत लेवे यांचा मुलगा नीलेश लेवे याने संशयितांना २० लाखांची सुपारी दिली होती. हे पोलिसांनी काही संशयितांना पकडल्यानंतर समोर आले होते. त्यानंतर पोलिसांच्या तपासात संशयितांनी कास मार्गावरील यवतेश्वर परिसरात काही दिवसांपूर्वीच गोळीबाराचाही सराव केला होता हेही समोर आले. त्यामुळे ते ठिकाण पाहण्यात आले आहे. त्याचबरोबर सायबर विभागाकडूनही या घटनेबाबत माहिती घेतली जात आहे. काही ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात येत आहे, असेही सातारा शहर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तर आणखी एक संशयित फरार असून त्याच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
Satara: धीरज ढाणे खून सुपारी प्रकरण: कास मार्गावर संशयितांकडून गोळीबाराचा सराव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:01 IST