माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यामुळे वेळेची बचत होऊ लागली आहे. मात्र काही स्थानिक ग्रामस्थांमुळे या रस्त्याचे विद्रुपीकरण होत आहे. काहीजण दुभाजकाचा उपयोग शेणी थापण्यासाठी करत आहेत. त्यामुळे दुभाजकाची पुरती वाट लागली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. ढेबेवाडी रस्त्यावरील दुभाजकावर लावण्यात आलेली सर्व झाडे सुकली आहेत. तसेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशाची तीव्रता कमी व्हावी, यासाठी बसविलेल्या रिप्लेक्टरची बऱ्याच ठिकाणी मोडतोड करण्यात आली आहे. झाडे पाण्याअभावी होरपळली आहेत. मध्यंतरी काही ग्रामस्थ राजरोसपणे दुभाजकावर मोठ्या प्रमाणावर गवत असल्याने जनावरे चरण्यासाठी सोडत होते. सध्या कऱ्हाड तालुक्यातील चचेगावपासून तारुखपर्यंत बऱ्याच ठिकाणी शेणी थापल्या आहेत. हे काम स्थानिकांचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
फोटो : ०८केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील दुभाजकाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्ता भकास दिसत आहे.