धोम धरणाच्या गाळात दडलाय काळ !

By Admin | Updated: March 16, 2016 23:38 IST2016-03-16T22:10:28+5:302016-03-16T23:38:33+5:30

डोहात उडी, मृत्यूशी गाठ : तहान भागविणाऱ्या जलाशयानं घेतले अनेकांचे जीव; सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा

Dhamalaya period in the crash! | धोम धरणाच्या गाळात दडलाय काळ !

धोम धरणाच्या गाळात दडलाय काळ !

वाई : दूरवर पसरलेला जलाशय अन् मनाला मोहिनी घालणारं निसर्गसौदर्य असं हे हिरव्या कोंदणात असलेलं ठिकाण म्हणजे वाई तालुक्यातील धोम धरण. पाचगणी, महाबळेश्वरला फिरायला आलेल्या पर्यटकांना धोम धरणाचा डोह जणू भुरळ पाडतो. म्हणूनच धोमच्या डोहात डुंबण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. पण हाय... डोळ्यांना सुखावणारा आणि कोरडे घसे ओलावणारा हा जलाशय गाळाचं प्रमाण वाढल्यानं चक्क माणसांच्याच जिवावर उठलाय.
धरणे ही राष्ट्रीय सपत्ती मानली जाते. सातारा जिल्ह्यात कोयना धरणानंतर वाई तालुक्यातील धोम धरण महत्त्वाचे मानले जाते. या धरणामुळे वीज, शेती सिंचन, पिण्याचे पाणी हे प्रश्न सोडविण्यात मदत झाली आहे. या धरणामुळे अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. गेल्या चार दशकांपासून माणसासह पशु-पक्ष्यांची तहान भागविणाऱ्या धोम धरणाकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. असुरक्षितता वाढली आहे. प्रशासनाने याची वेळीच दखल घेणे गरजेचे बनले आहे.
महाबळेश्वरमध्ये उगम पावणाऱ्या कृष्णा नदीवर धोम येथे १३.५० टीएमसी क्षमतेच्या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. ३८२.३२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असलेल्या धरणाचे पाणलोट क्षेत्र २१७.५६ चौरस किलोमीटर आहे. तर बुडित क्षेत्र २४०० हेक्टर इतके
आहे.
धरणनिर्मितीत ४२ गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. या धरणामुळे राज्यातील हजारो एकर जमीन पाण्याखाली आली आहे. दुष्काळी खंडाळा, फलटण तालुक्यातील अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची सोय होऊन अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. धोम धरणातून बोगद्याने खंडाळा तालुक्यात कालव्याने पाणी नेले आहे व यासाठी धोम बलकवडी या दुसऱ्या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे.
पाचगणी, महाबळेश्वरला फिरण्यासाठी येणारे पर्यटक धोम धरण परिसरातील येथील निसर्गसौंदर्यामुळे आवर्जून भेटी
देतात.
या भागात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. चित्रसृष्टीलाही या परिसराने जणू वेड लावले आहे. परंतु वर्षानुवर्षे पावसाळ्यात डोंगराउतारावरील माती धरणाच्या पाण्यात वाहत जाऊन धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पर्यटक पोहोण्यासाठी पाण्यात उतरतात पण अंदाज न आल्यामुळे गाळात अडकतात. या गाळामुळे आजपर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. (प्रतिनिधी)


प्रवासी लाँचला झुडपांचा विळखा
धरणाच्या जलाशयात फिरण्यासाठी प्रवासी लाँचची सोय करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून ही लाँच धरणाच्या संरक्षक भिंतीजवळ पडून आहे. झाडाझुडपांच्या विळख्यात ही बोट अडकलेली पाहायला मिळते. मोडकळीस आलेल्या या बोटीला सुरक्षित ठिकाणी ठेवावे, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.


संरक्षक कठडे ढासळले,
सुरक्षा चौक्या मोडकळीस
धरणाच्या भिंतीवरील संरक्षक कठड्याचे बांधकाम ढासळले आहे. विजेचे दिवे नादुरुस्त झाले आहेत. वाई-जांभळी रस्त्यावरील गेटवरही कोणतीही सुरुक्षा व्यवस्था राहिलेली नाही. सुरक्षा चौक्या मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

पोलिस संरक्षण नाही
धरणाच्या सुरक्षेसाठी पूर्वी पोलिस बंदोबस्त असायचा. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथे बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी पाठविले जात नाहीत. पूर्वी तीन पोलिस कर्मचारी व एक अधिकारी धोम धरणावर सुरक्षिततेसाठी असायचे. सध्या येथे नऊ ते दहा कर्मचारी असून त्यात वॉचमन, वायरलेस आॅपरेटर व देखरेखीसाठी मजूर अशी कामे करतात. कामगार निवृत्तीनंतर त्यांच्या जागी नवीन नियुक्त्या झाल्या नाहीत.

मद्याच्या बाटल्या
अन् प्लास्टिक कचऱ्याचा खच
धोम धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची व नागरिकांची मोठी संख्या आहे. काही पर्यटक धरणाच्या काठावर बसून मद्यपान करतात अन् बाटल्या तेथेच फेकून देतात. तसेच प्लास्टिकच्या बाटल्या, ग्लास, पिशव्या अशा कचऱ्याचा जागोजागी खच पडला आहे. याबाबत धरण व्यवस्थापनाने कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Dhamalaya period in the crash!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.