ढाक्कुमाकुमऽऽसंगत बाल गोपाळांची।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:42 IST2021-08-28T04:42:49+5:302021-08-28T04:42:49+5:30
मजा लुटुया काल्याची। कृष्णाष्टमीनंतर दुसऱ्यादिवशी दहीहंडीचा उत्सव साजरा होतो. या उत्सवाला सुरुवातीपासूनच सार्वजनिक स्वरूप आहे. उंचच उंच थर रचणाऱ्या ...

ढाक्कुमाकुमऽऽसंगत बाल गोपाळांची।
मजा लुटुया काल्याची।
कृष्णाष्टमीनंतर दुसऱ्यादिवशी दहीहंडीचा उत्सव साजरा होतो. या उत्सवाला सुरुवातीपासूनच सार्वजनिक स्वरूप आहे. उंचच उंच थर रचणाऱ्या गोविंदांचा या उत्सवातील उत्साह अफाट असतो. या गोविंदा पथकांबरोबरच चिमुकल्यांच्या उत्साहालाही दहीहंडीत उधाण येते. अगदी अंगणवाडीपासून माध्यमिक शाळांपर्यंत सर्वच ठिकाणी हा उत्सव साजरा होतो आणि या उत्सवात मुले हिरीरीने सहभागी होतात, हे विशेष.
प्रत्येक मराठी सण आणि उत्सवाला परंपरेबरोबरच आध्यात्मिक किनार लाभली आहे. सण अथवा उत्सव साजरा करण्यामागील कारण, पद्धत आणि मर्यादाही परंपरेने घालून दिलेल्या आहेत. मात्र, काळाच्या ओघात या परंपरा विस्मृतीत जाण्याची भीती आहे. त्यामुळे आपली संस्कृती, परंपरा, सण, उत्सव जतन करण्याचा प्रयत्न प्रत्येक पातळीवर होताना दिसतोय. संस्कृतीची जाण बालवयात झाली, तर ती चिरंतन टिकवून ठेवता येऊ शकते. त्यामुळे शाळांमध्येच मराठी सण, उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. दहीहंडीही त्याला अपवाद नाही. बहुतांशी मराठी शाळांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो.
मोठमोठी बक्षिसे ठेवून आयोजित केल्या जाणाऱ्या दहीहंडीचे स्वरूप मोठे असते. त्याप्रमाणात बालगोपालांची दहीहंडी मर्यादित असली, तरी त्याचा बाज आणि साजही वेगळा असतो. पारंपरिक पोषाख हे चिमुकल्यांच्या दहीहंडीचे आकर्षण. वेगवेगळ्या पोषाखात नटूनथटून आलेली मुले या उत्सवाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. परंपरेने चालत आलेल्या मूळ दहीहंडीचे ते मूर्तरूप असते. पताकांनी सजविलेले शाळेचे प्रांगण, त्यामध्ये मधोमध कमी उंचीवर लटकवलेली हंडी आणि ती फोडण्यासाठी होणारी चिमुकल्यांची धांदल हे चित्र उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडते. गत वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे चिमुकल्यांना दहीहंडी साजरी करता आलेली नाही. यंदाही चिमुकले या उत्सवाला मुकणार आहेत; पण कोरोनानंतर पुन्हा नव्या जोमात हा दहीकाला शाळांमध्ये साजरा होईल, हे निश्चित.
- संजय पाटील
- चौकट (फोटो : २७संडे०२)
बालकृष्ण ठरतो आकर्षण
शाळांमधील दहीहंडीत कृष्णाच्या वेशभूषेत सहभागी झालेला चिमुकला सर्वांचे आकर्षण ठरतो. बालकृष्णाची निवड शाळेतील शिक्षिका करतात. त्या मुलाला बालकृष्णाचे रूप देण्यासाठीही शिक्षिकांसह त्याच्या पालकांची धडपड असते. हा बालकृष्ण सर्वांमध्ये उठून दिसावा, असा सर्वांचा प्रयत्न असतो आणि हा प्रयत्न यशस्वीही होतो.
फोटो : २७संडे०१
कॅप्शन : प्रतीकात्मक