सचिन काकडे -- सातारा -सातारा शहराने ‘पेन्शनरांचं गाव’ म्हणून ओळख निर्माण केली असली तरी गेल्या काही वर्षांपासून झालेल्या औद्योगिक आणि व्यायसायिक क्रांतीने ही ओळख बदलू लागली आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणारे ढाबे आता हद्दपार होत असून, त्यांची जागा अत्याधुनिक आणि हायटेक हॉटेल्स घेत आहेत. त्यामुळे खाद्य यात्रेतही साताऱ्याची ओळख ‘हायटेक सातारा’ अशी होऊ लागली आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग जेव्हा वाहतुकीसाठी खुला झाला तेव्हापासून खऱ्या अर्थाने साताऱ्याच्या विकासाचे पर्व सुरू झाले. महामार्गावर शिरवळ ते कऱ्हाड या जवळपास ११२ किलोमीटरच्या पट्ट्यात अनेक छोटी-मोठी हॉटेल्स आणि ढाबे सुरू झाले. काळानुसार यात हळूहळू बदलही होत गेले. मात्र, केवळ खाद्यसंस्कृती जपण्याचे कामच या माध्यमातून होत राहिले. पर्यटकांना हव्या असणाऱ्या सेवा-सुविधांचा अभाव मात्र कायमच राहिला. महामार्गावर एकही थ्री-स्टार हॉटेल नव्हते की, शॉपिंग मॉल नव्हता. त्यामुळे पुण्याहून कोल्हापूरकडे जाणारे शेकडो पर्यटक, वाहनधारक साताऱ्याऐवजी थेट कोल्हापूर गाठत होते. त्यामुळे साताऱ्याचा औद्योगिक विकास होत असताना व्यावसायिकदृष्ट्या विकास होत नसल्याचे चित्र आता पालटल्याचे दिसत आहे. मात्र, आता महामार्गावर वाढलेली वाहतूक, सहापदरीकरण आणि भविष्याचा वेध घेत येथील व्यावसायिकांनी कात टाकायला सुरुवात केली आहे. शिरवळ ते कऱ्हाड या ११२ किलोमीटरच्या पट्ट्यात जागोजागी दिसणारे ढाबे आता हद्दपार होत असून, त्यांची जागा सुसज्ज आणि सर्वसोयीनियुक्त हॉटेल्सनी घेतली आहे. शिरवळ-कऱ्हाड दरम्यान जवळपास २० थ्री-स्टार हॉटेल्स आज ऐटीत उभी आहेत. नागरिकांना त्यांच्या आवडीनुसार सर्व सुविधा या माध्यमातून उपलब्ध केल्या जात आहेत. अगदी महाराष्ट्रीयन, पंजाबी, गुजराती, इटालीयन, चायनीस असे अनेक खाद्यपदार्थ आपल्या हॉटेलात उपलब्ध करण्याचा आग्रह अनेक हॉटेल व्यावसायिकांमध्ये दिसत आहे. पूर्वी केवळ मुंबई आणि पुणे यांसारख्या बड्या शहरात दिसणारे शॉपिंग मॉलही आता या महामार्गावर डौलाने उभे राहू लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांसह सातारकरांना सर्व सेवा-सुविधा एकाच छताखाली सहजरीत्या उपलब्ध होत आहेत. शॉपिंग मॉलच्या पलीकडे जाऊन आता ‘फुड मॉल’ही सुरू होत आहेत. महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची पावले आपसूकच साताऱ्यात विसावत आहेत. छोट्या-मोठ्या कार्यक्रमांसह अगदी ऐनवेळची बर्थ-डे पार्टी ते लग्नसमारंभापर्यंत अनेक कार्यक्रम महार्गावरील हॉटेल्समध्ये साजरे होताना दिसत आहेत. हॉटेल, शॉपिंग मॉल्स, फुड मॉल यांच्या बदलत्या आणि वाढत्या संख्येबरोबरच व्यावसायिक विकासही होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असून, अनेकांना रोजगाराचे साधनही उपलब्ध होत आहे. एकूण पाहता साताऱ्याची ओळख ही ‘पेन्शनरांचं गाव’ अशी न राहता उद्योग आणि व्यावसाय पाहता ‘हायटेक सातारा’ अशी होऊ लागली आहे. त्यामुळे सातारा हे आता ‘हॉल्टिंग डेस्टिनेशन’ ठरू पाहत आहे.कोण म्हणतंपेन्शनरांचं गाव?आधुनिक कनेक्ट : ई-मेल, व्हाट्सअॅपच्या माध्यमातूनही संवादपर्यटक व नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या साताऱ्यातील अनेक हॉटेलचालकांनी आधुनिकतेवर भर दिला आहे. हॉटेलमध्ये आलेल्या आपल्या ग्राहकाला उत्तम सेवा देण्याबरोबरच त्या ग्राहकाशी ई-मेल अथवा व्हाट्सअॅपच्या माध्यमातून कायमस्वरूपी संपर्क साधला जात आहे. हॉटेलमध्ये होणारे नवीन बदल, वाढदिवस, सण, उत्सवांच्या शुभेच्छाही ग्राहकांना ई-मेल, व्हाट्सअॅपच्या माध्यमातून दिल्या जात आहे. त्यामुळे ग्राहक अन् हॉटेलचे कायमस्वरूपी ऋणानुबंध जपले जाते. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या व्यक्ती आवर्जून त्याच हॉटेलला भेटी देतात.
महामार्गावरील ढाबे गेले... आता हायटेक हॉटेल्स आली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2016 00:36 IST