कऱ्हाड : येथील कृष्णा कोयना नदीच्या पवित्र प्रीतिसंगमावर बुधवारी मौनी अमावास्येच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी अमृत स्नानासाठी गर्दी केली होती. हजारो भाविकांनी प्रीतिसंगावर अमृत स्नान केले.सध्या प्रयागराजला महाकुंभमेळा भरला आहे. प्रयागराज संगमावर कोट्यवधी भाविक दाखल झाले असून, तेथे स्नान करीत आहेत. कऱ्हाडलाही कृष्णा-कोयना नदीच्या पवित्र प्रीतिसंगम झाला आहे. त्यामुळे याला धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन बुधवारी मौनी अमावास्येच्या पार्श्वभूमीवर अनेक भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली होती. प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि अदृश्य स्वरूपातील सरस्वती अशा तीन नद्यांचा संगम झाला आहे. पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर या ठिकाणी महा कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. दर १२ वर्षांनी अशा महा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. कुंभमेळ्यासाठी जगभरातून भाविक दाखल होत असतात. मोक्षप्राप्तीची कामना ठेवत ते पवित्र स्नान करत असतात; पण प्रत्येकालाच या कुंभमेळामध्ये सहभागी होता येईल, असे नाही. त्यामुळे तेथे पोहोचू न शकणाऱ्या अशा अनेक भाविकांनी बुधवारी कऱ्हाडतील कृष्णा-कोयना नदीच्या पवित्र प्रीतिसंगमावर मौनी अमावास्येच्या निमित्ताने स्नान करत मोक्षप्राप्तीची कामना केली.
Satara: कऱ्हाडच्या प्रीतिसंगमावर अमृतस्नानासाठी भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:24 IST