शिवथरमध्ये विकासाची चळवळ राबवूया

By Admin | Updated: November 24, 2014 23:12 IST2014-11-24T21:23:18+5:302014-11-24T23:12:19+5:30

जिल्हाधिकारी : शिवारफेरीत स्वच्छतागृहाचा आकडा शून्यावर आणण्याचे आवाहन

The development movement in Sivathar has been implemented | शिवथरमध्ये विकासाची चळवळ राबवूया

शिवथरमध्ये विकासाची चळवळ राबवूया

शिवथर : ‘स्वत:च घर बांधत असताना ज्या पध्दतीने आपण लक्ष देतो. त्याच पध्दतीने प्रत्येकाने आपल्या गावावर लक्ष ठेवलं पाहिजे. गावामधील विविध विकासकामे गावकऱ्यांनीच सूचवायची. त्याची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत. समान भावना ठेवून विकासाची चळवळ उभी राहणार आहे. विकासाची परिभाषा म्हणजे एक-एक करून सर्व शून्य झाल्यास खरा विकास होईल. गावातील मुलभूत गरजा व समस्या दूर झाल्या पाहिजेत,’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.
शिवथर, ता. सातारा येथे ‘संसद आदर्श दत्तक ग्राम’ योजनेंतर्गत राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेच्या खा. अनू आगा यांनी शिवथर गाव दत्तक घेतल्याबद्दल ग्रामसभेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, डॉ. अविनाश पोळ, प्रांताधिकारी माल्लिकार्जुन माने, तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप, माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील, बबनराव साबळे, सरपंच अनिता कांबळे, उपसरपंच अशोक साबळे आदी उपस्थित होते.
अश्विन मुदगल म्हणाले, ‘गावामध्ये जी कामे आहेत त्याचे मूल्यांकन करून तातडीने त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. कोणतेही काम बाकी राहिले नाही पाहिजे. इंदिरा आवास, बचत गटांना रोजगार, अंतर्गत रस्ते, पाणंद रस्ते याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून गावामध्ये कोणतेही काम राहता कामा नये, अशा सूचना सर्व खात्यातील अधिकाऱ्यांना देत या गावाचा नावलौकिक देशामध्ये झाला पाहिजे.’ कार्यक्रमासाठी सहायक वनअधिकारी एम. एन. मोहिते, वनक्षेत्रपाल व्ही. आर. शिंदे, सुनील भोसले, गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ साबळे, प्रमोद साबळे, प्रकाश साबळे, सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य विभाग, वनविभागातील सर्व अधिकारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)


संपूर्ण गावाला एकंदरीत आणण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करून काही कालावधीमध्ये गावाचा चेहरा-मोहरा बदलला जाईल.
-जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी


संयुक्त वनसमिती शिवथर व वनविभाग यांच्या माध्यमातून गावातील ब्ांी. पी. एल. धारकांना गॅस वितरण करण्यात आले.


पाच तास दिला वेळ
गावामध्ये तब्बल पाच तास थांबून गावाचा विकासकामाबाबत आराखडा तयार केला आहे. मुस्लिम स्मशान भूमी रस्ता आर. सी. सी. बंधारा, ब्रिटिशकालीन बंधाऱ्यावर भेट, त्याबाबत उपाययोजना, पाणंद रस्ते खुले करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात जिल्हाधिकारी यांनी शिवार फेरी काढली.


ऊसतोड कामगारांची ‘अडचण’ ही दूर करणार
गावामध्ये सध्या ऊसतोडीसाठी आलेले लोक शौचालयाला उघड्यावर जातात. याबाबत संबंधित कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यांची शौचालयाची अडचण दूर केली जाईल, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.

Web Title: The development movement in Sivathar has been implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.