कुडाळ : जावळी तालुक्यातील बहुतांश भाग दुर्गम डोंगराळ आहे. परिसरातील रब्बीची पिके चांगली आली असून, जंगली प्राण्यांचे कळप रब्बीच्या पिकाची नासधूस करीत आहेत. यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. वनविभागाने या जंगली श्वापदांचा बंदोबस्त करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
वनविभागाने राबविलेल्या मोहिमेमुळे वृक्षतोड कमी झाल्याने या प्राण्यांना मूळचा नैसर्गिक आदिवास मिळाल्यामुळे डोंगरभागात वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या भागात बिबटे, रानगवे, रानडुक्कर, वाघ, लांडगे, कोल्हे आदी जंगली प्राण्यांचा वावर वाढला असून, अन्नाच्या शोधात या प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस होत आहे. यावर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू ही पिके जोमात आहेत. रात्रीच्या वेळी थंडीची पर्वा न करता शेतकरी पिकांना पाणी देण्याचे काम करीत आहे. अशातच हातातोंडाशी येत असलेला घास जंगली प्राण्यांमुळे हिरावला जात आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, पिकांचे नुकसान टाळण्यासाठी वनविभागाने तत्काळ वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी डोंगरी भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.