नियतीनं मारलं पण कर्तृत्वानं तारलं!
By Admin | Updated: January 6, 2015 00:48 IST2015-01-05T23:46:46+5:302015-01-06T00:48:27+5:30
एका अंधाची खिलाडूवृत्ती : आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘नेत्र’दीपक कामगिरी

नियतीनं मारलं पण कर्तृत्वानं तारलं!
सातारा : एका डोळ्यानं अंध असूनही क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर भरारी घेणाऱ्या अजय सिद्धार्थ आगेडकरची यशोगाथा थक्क करणारी आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अजयने भालाफेक, थाळीफेक व लांब उडी या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवून ‘नेत्र’दीपक कामगिरी केली आहे. चार महिन्याचा असताना नियतीनं अजयच्या एका डोळ्याची दृष्टी हिरावून घेतली; पण त्याने स्वकर्तृत्वाने इतरांचे डोळे दिपतील असे देदिप्यमान यश मिळविले आहे.
कोरेगाव तालुक्यातील अपशिंगे हे अजयचे गाव. चार महिन्याचा असताना अजयच्या वाट्याला खडतर जीवनप्रवास आला. एका डोळ्यातून सतत पाणी येत असल्याने डॉक्टरांनी डोळ्याची नस दबलेली असल्याने शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. आजोबांनी शस्त्रक्रियेचा खर्च उचलला आणि शस्त्रक्रिया झाली. आता अजयला डोळ्याने चांगले दिसेल, या कल्पनेने सारं कुटुंब आनंदून गेलं होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. शस्त्रक्रियेनंतरही अजयच्या डोळ्याच्या तक्रारी दूर होत नव्हत्या. त्यानंतर अजयला त्याच्या पालकांनी मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमधील नेत्रतज्ज्ञास दाखविले. त्यानंतर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली.
मात्र, तरीही अजयचे भोग संपले नाहीत. तिसरी शस्त्रक्रिया केली मात्र तिही निष्फळ ठरली.
आजोबांनी अजयला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखविले. तेथील डॉक्टरांनी अधू डोळ्याची नस तोडली नाही तर दुसऱ्या डोळ्यालाही इजा पोहोचू शकते, असे सांगितले. यामुळे सारं कुटुंबच हादरून गेलं. लहानपणीच डोळ्याची नस तोडली अन् अजयच्या एका डोळ्याची दृष्टी कायमची गेली.
अशा संघर्षमय आयुष्य वाट्याला येऊनही खचून न जाता अजयने विविध क्रीडा प्रकारात आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविली आहे. शालेय स्तरापासून ते आज महाविद्यालयीन पातळीवर होणाऱ्या अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये अजयने नावलौकिक मिळविला आहे.
खेळाप्रमाणेच अजय अभ्यासातही हुशार आहे. दहावीत उत्तम गुण मिळविल्यानंतर सिव्हिल इंजिनिअर होण्याचं स्वप्न घेऊन त्याने खटाव येथील गौरीशिव पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्याने चमकदार कामगिरी करून दाखविली. (प्रतिनिधी)
क्रीडा क्षेत्रात ‘सुवर्ण’भरारी
इंडियन ब्लाइंड स्पोर्ट असोसिएशन, नवी दिल्ली तर्फे घेण्यात आलेल्या भालाफेक, थाळीफेक, लांब उडी या स्पर्धांमध्ये अजयने तीन सुवर्णपदके मिळवून क्रीडा क्षेत्रात ‘सुवर्ण’भरारी घेतली आहे. दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तो अभिमानास्पद कर्तृत्व दाखवेल, हे निश्चित.
आपल्याकडे जे नाही, त्याने खचून न जाता, जे आहे त्याचा उपयोग कसा करून घेता येईल, याचा सकारात्मक विचार करावा. ग्रामीण भागात खेळाडूंना चांगल्या सोयीसुविधा मिळत नाहीत हे खरे; पण कठोर परिश्रम घेण्याची तयारी आणि सरावात सातत्य टिकवून ठेवले तर यश निश्चित मिळते.
- अजय आगेडकर