देसाई-पाटणकरांचा पैसा लागला खुळखुळू!
By Admin | Updated: August 23, 2014 23:47 IST2014-08-23T23:44:43+5:302014-08-23T23:47:37+5:30
उध्दव ठाकरेंची सभा : पन्नास लाखांचा हिशोब म्हणे डोळे विस्फारणारा

देसाई-पाटणकरांचा पैसा लागला खुळखुळू!
पाटण : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तालुक्यात आणून त्यांच्यासमोरच शंभूराज देसाई यांनी सांगितले की, ’माझा पराभव जनतेने नाही तर विक्रमसिंह पाटणकरांच्या धनशक्तीने केला.’ यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आपली मते विकू नका, गतवेळेपेक्षा आता चौपट भाव होईल.’ या आरोपवर लगेचच आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी पत्रक काढून ‘शंभूराज देसाई यांनी एक दिवसात ५० लाखांहून अधिक चुराडा केला. एवढा पैसा कुठून आणला ते जाहीर करावे,’ अशी टीका केल्यामुळे पाटण तालुक्याचे राजकारण आता देसाई-पाटणकर यांच्या संपत्तीपर्यंत येऊन ठेपले आहे.
पाटण तालुक्यातील राजकारण आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे. परिणामी येथील राजकीय पटलावर कोणतीही घटना घडलीतरी त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष गेल्याशिवाय राहत नाही. पाटण तालुक्याचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेभोवतीच फिरते.
२००९ च्या निवडणुकीत ५८० मतांनी पराभव झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसांपासून शंभूराज देसाई यांनी आजअखेर नेहमीच पाटणकरांच्या धनशक्तीने माझा पराभव केल्याची ओरड करत आले आहेत. पाटणकरांनी कोयना अॅग्रो, सकस यासारखे खासगी उद्योग काढून स्वत:चा फायदा करून घेतला. तालुक्यातील तरुणांसाठी एक सार्वजनिक उद्योग उभा केला का ? असा सवाल शंभूराज देसाई नेहमीच करतात तर देसाई कारखाना वगळता एकसुद्धा उद्योग निर्मिती देसार्इंना करता आली नाही, मग उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी एवढा पैसा कुठून आला असे कोणते उद्याग व्यवसाय त्यांनी उभे केले हे जाहीर करावे, असे आव्हान करून विक्रमसिंह पाटणकर यांनी प्रथमच देसार्इंच्या विरोधात एवढी आक्रमक भूमिका घेतली आहे. एवढेच नव्हे तर मरळी येथील कार्यक्रमावर जो पैसा खर्च केला तोच पैसा जर ऊस उत्पादकांना दिला असता तर शेतकऱ्यांना आनंद झाला असता. शेकडो दुचाकींची रॅली ५०० हून अधिक वाहने, भव्य मंडप हे प्रदर्शन दाखविण्याचा मोह देसार्इंना टाळता आला नाही. मात्र, दुसरीकडे कारखान्याच्या कामगारांचा पगार देणे असलेली थकबाकी असे असताना राजकारणासाठी कोट्यवधींचा खर्च कशाचे द्योतक आहे,’ अशी टीका आता पाटण तालुक्यातून होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)
वाद नेहमीचाच..!
राजकारणाचा विचार करता गेल्या काही दिवसांत पाटण तालुका नेहमीच संघर्षमय बनला आहे. पाटण तालुक्यात कोणताही वाद असलातरी तो राजकीयच असतो, ही बाब लपून राहिलेली नाही. परिणामी यामध्ये आपोआपच आ. विक्रमसिंह पाटणकर आणि माजी आ. शंभूराज देसाई येतात. ग्रामीण भागात वाद झाला तरी तो आमदार पाटणकर आणि माजी आमदार देसाई गटाशीच जोडला जात आहे.