अस्तित्व अन् प्रतिष्ठेच्या लढाईत देसाई गट यशस्वी
By Admin | Updated: March 24, 2016 23:58 IST2016-03-24T21:30:43+5:302016-03-24T23:58:51+5:30
विरोधक पिछाडीवर : आमदारकी ते कारखाना व्हाया सोसायटी, ग्रामपंचायती अन् पंचायत समिती

अस्तित्व अन् प्रतिष्ठेच्या लढाईत देसाई गट यशस्वी
अरूण पवार -- पाटण --लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि विधानसभेनंतरही आमदार शंभूराज देसाई यांची घोडदौड सुरूच राहिली असल्याचे स्पष्ट झाले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी ही देसाई यांची असलेली घोडदौड विरोधक पाटणकर गटाला निश्चित रोखता आलेली नाही. त्यामुळे अद्यापही पाटणकर गट विधानसभेनंतर पिछाडीवर असल्याचे दिसत असले तरी आगामी जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणुकांमध्ये दोन्ही गटांची झुंज पाहायला मिळणार आहे.देसाई कारखाना म्हणजे देसाई घराण्याची आण, बाण, शान आहे. प्रतिष्ठा-अस्तित्वाचा प्रश्नदेखील कारखान्याच्या निवडणुकीमुळे निर्माण होतो. याच वर्गावर बोट ठेवून आमदार देसाई यांचे प्रतिस्पर्धी विक्रमसिंह पाटणकर यांनी मागीलप्रमाणे निवडणूक लढायला हवी होती. निवडणुकीत पराभव होणार, हे पाटणकरांना माहीत होते. मात्र, याचा पर्याय म्हणजे माघार नव्हे, शेवटी काय झाले. माघार घेऊनसुद्धा पाटणकर यांना आ. देसाई यांनी चांगलेच कोंडीत पकडले. साखर कारखाना निवडणुकीत पाटणकर पिता-पुत्रांनी समोरासमोर येऊन लढायला हवे होते. पडद्याआडच्या हालचाली करून पॅनेल उभे केले हा आणि मोठा पराभव असल्याची प्रतिक्रिया आ. देसाई यांनी निकालानंतर दिली. निवडणूक लढविणार नाही, असे म्हणून चालणार नाही आणि चालले नाही. कारण शेवटी आ. देसाई यांनी पाटणकर गटच निवडणुकीत होता, असा आरोप केला. राजकारणात गटाचे अस्तित्व टिकविण्यासाठी सारे काही क्षम्य असते, हेच खरे.
लोकनेते बाळासाहेब देसाई व दिवंगत शिवाजीराव देसाई यांच्या विचारावर निष्ठा ठेवून सभासदांनी कौल दिला आहे. माझ्या पॅनेलसमोर उभे ठाकलेले विरोधी पॅनेल हे विक्रमसिंह पाटणकर व सत्यजित पाटणकर यांनीच उभे केले होते. या दोघांनी निवडणुकीत पडद्याआड राहून हालचाली केल्या. पाटणकर पिता-पुत्रामध्ये समोर लढण्याची हिंमत नव्हती; पण मतदान व मतमोजणीदिवशी त्यांचे कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, युवक अध्यक्ष शंकर शेडगे हे सक्रिय उपस्थित होते.
-शंभूराज देसाई,
आमदार
आमदारकीपासून वर्चस्व कायमच..
एकेकाळी कारखाना सोडला तर तालुक्याच्या सर्व सत्ता एकहाती पाटणकर गटाकडे होत्या. ग्रामपंचायती, सोसायट्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ या निवडणुकांत शंभूराज देसाई गटाची डाळ शिजत नव्हती; आता मात्र बाजी पलटली आहे. आमदारकी, पंचायत समिती आणि साखर कारखाना यामध्ये शंभूराज देसाई यांनी वर्चस्व मिळविले आहे.
आमदारकीपासून वर्चस्व कायमच..
एकेकाळी कारखाना सोडला तर तालुक्याच्या सर्व सत्ता एकहाती पाटणकर गटाकडे होत्या. ग्रामपंचायती, सोसायट्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ या निवडणुकांत शंभूराज देसाई गटाची डाळ शिजत नव्हती; आता मात्र बाजी पलटली आहे. आमदारकी, पंचायत समिती आणि साखर कारखाना यामध्ये शंभूराज देसाई यांनी वर्चस्व मिळविले आहे.