शिक्षण उपसंचालक क्षीरसागर यांनी घेतला शैक्षणिक आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:42 IST2021-02-09T04:42:08+5:302021-02-09T04:42:08+5:30
कऱ्हाड : राज्याचे शिक्षण उपसंचालक (अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण विभाग) राजेश क्षीरसागर यांनी सातारा जिल्ह्याला शुक्रवारी भेट देऊन ...

शिक्षण उपसंचालक क्षीरसागर यांनी घेतला शैक्षणिक आढावा
कऱ्हाड : राज्याचे शिक्षण उपसंचालक (अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण विभाग) राजेश क्षीरसागर यांनी सातारा जिल्ह्याला शुक्रवारी भेट देऊन येथील शैक्षणिक स्थिती जाणून घेतली. अल्पसंख्याक शिष्यवृत्तीबाबत आढावा घेण्यात आला व संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या. दरम्यान, प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती अर्जांची शाळास्तरावर पडताळणी करण्यासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोल्हापूर विभागातील पाचही जिल्ह्यांना क्षीरसागर यांनी मागील आठवड्यात भेटी दिल्या. सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथील एचकेडी उर्दू हायस्कूल व नप शाळा क्र ५, सातारा येथील कल्याणी हायस्कूल या शाळांतील अल्पसंख्याक शिष्यवृत्ती अर्ज व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तसेच विविध समस्यांबाबत चर्चा केली. शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना जिल्ह्यातील सर्वच शाळांमधील प्री-मॅट्रिक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज व त्यासोबतची कागदपत्रे समक्ष पडताळणी करण्याच्या सूचना क्षीरसागर यांनी दिल्या आहेत. राज्यातील सर्वच जिल्ह्यात संचालनालयातील अधिकाऱ्यांच्या भेटी होत असून, अर्ज व कागदपत्रांची समक्ष पडताळणी करण्यात येत आहे.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना केंद्रशासनामार्फत ही शिष्यवृत्ती देण्यात येते. सर्वसाधारण विद्यार्थ्यास वार्षिक एक हजार आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यास वार्षिक दहा हजार रुपयांपर्यंत ही शिष्यवृत्ती मिळू शकते. अर्ज करणारे सर्वच पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तिधारक होऊ शकतीलच असे नाही, तर अधिक गुण आणि कमी उत्पन्न असणारे विद्यार्थी यातून निवडले जातात. सुमारे २ लाख ८५ हजार इतके उद्दिष्ट राज्यासमोर असते. मात्र प्रत्यक्षात अर्ज पाच लाखांहून जास्त येतात. उद्दिष्टापेक्षा दुप्पट अर्ज आल्याने गरजूंना लाभ देताना अडचणी निर्माण होतात.
अल्पसंख्याक शिष्यवृत्तीबाबतच्या अर्जांची पडताळणी शाळांनी करून जिल्ह्याला पाठवावी लागते. जिल्ह्यातून ही माहिती राज्याला पाठविली जाते. हे अर्ज वेळेत पाठविणे अपेक्षित असते. अनेकवेळा खोटी माहिती सादर करण्याची शक्यता असते. त्यामुळे यातील संबंधित कागदपत्रांची व कारभाराची प्रातिनिधिक पडताळणी करण्यासाठी क्षीरसागर यांनी सातारा जिल्ह्याचाही शासकीय दौरा केला.
यावेळी प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, पथक सदस्य बी. एम. कासार, जे. टी. पाटील, गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर उपस्थित होत्या.
चौकट :
काय आहे योजना?
मुस्लीम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, शीख, पारशी या अल्पसंख्याक समाजातील इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि ज्यांच्या पालकांचे उत्पन्न एक लाखांपर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करता येतो. एनएसपी पोर्टलवर याबाबतचे ऑनलाइन अर्ज विद्यार्थ्यांनी दाखल करायचे असतात. शाळांकडून शाळा स्तरावर त्यांची तपासणी होते आणि ते जिल्ह्याला ऑनलाइन पद्धतीने पाठविले जातात. यासाठी ऑनलाइन अर्ज, सक्षम अधिकाऱ्याचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील वर्षाची गुणपत्रक ( इयता पहिली वगळता), धर्माबाबतचे स्वयंघोषित प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, बँक पासबुक आवश्यक असते.
फोटो ओळ :
कऱ्हाड येथील न.प.शाळा क्र. ५ येथे प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती अर्जांचा आढावा घेताना शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर.