मलकापुरात डेंग्यूची साथ

By Admin | Updated: May 27, 2014 23:11 IST2014-05-27T23:08:03+5:302014-05-27T23:11:11+5:30

तीन महिला रूग्ण : प्रशासनाकडून खबरदारीची उपाययोजना

With dengue in Mallakpur | मलकापुरात डेंग्यूची साथ

मलकापुरात डेंग्यूची साथ

 मलकापूर : येथील व्यंकटेशनगर व कोयना वसाहतीमध्ये डेंग्यूचे तीन रूग्ण आढळून आल्यामुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरूवात केली असून प्रत्येक घरास भेट देत तेथील पाण्याचे नमुने तपासले. तसेच फॉगिंगने पावडरची फवारणीही करण्यात आली आहे. व्यंकटनेशनगरमधील निर्मला सुनील थोरात या महिलेला डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर शहीदा अजीज मुल्ला (वय ५२) व संगीता संजय पाटील (वय ३९, दोघीही रा. कोयना वसाहत) यांच्या तपासणीत त्यांनाही डेंग्यूसदृष्य साथीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांना उपचारार्थ वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्यंकटेशनगरमध्ये वास्तव्यास असणार्‍या निर्मला थोरात या वडगाव हवेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लॅब टेक्निशिअन आहेत. सोमवारी ताप आल्यामुळे त्यांनी वडगाव हवेली उपकेंद्रातच प्राथमिक उपचार घेतले. मात्र, दोन दिवसानंतरही ताप कमी न आल्यामुळे बुधवारी त्यांना उपचारार्थ उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील उपचारानंतरही ताप कमी येत नसल्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांनी निर्मला थोरात यांच्या डेंग्यूबाबतच्या तीन तपासण्या केल्या. त्यादरम्यान, निर्मला थोरात यांना अधिक उपचारार्थ सिद्धीविनायक रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आलेल्या तपासणीवरून थोरात यांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मलकापूर नगरपंचायतीने ही बाब गांभीर्याने घेत मलकापूर, आगाशिवनगर, व्यंकटेशनगर, कोयना वसाहत परिसरात तपासणी मोहीम राबविली. त्यावेळी शहीदा मुल्ला व संगीता पाटील या दोन महिलांनाही डेंग्यूसदृष्य साथीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. (प्रतिनिधी)

Web Title: With dengue in Mallakpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.