म्हसवड येथील दुय्यम निबंधक कार्यालय पूर्ववत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:44 IST2021-09-14T04:44:56+5:302021-09-14T04:44:56+5:30
वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील एकमेव शहर असणाऱ्या म्हसवड येथील प्रत्येक बुधवारी सुरू असलेले दुय्यम निबंधक कार्यालय कोरोना व ऑनलाईन ...

म्हसवड येथील दुय्यम निबंधक कार्यालय पूर्ववत करण्याची मागणी
वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील एकमेव शहर असणाऱ्या म्हसवड येथील प्रत्येक बुधवारी सुरू असलेले दुय्यम निबंधक कार्यालय कोरोना व ऑनलाईन प्रोसेसच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी बंद केले आहे. यामुळे म्हसवड, वरकुटे-मलवडीसह बारा वाड्या, चौदा खेड्यांतील लोकांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे लोकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. म्हसवडला दर बुधवारी कार्यालय सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
म्हसवड नगरपालिका सर्वात जुनी असून, कागदोपत्री लोकसंख्या २५ हजार असली, तरी म्हसवड परिसरातील वास्तव लोकसंख्या ४० हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यात म्हसवड पालिकेच्या अंतर्गत असलेल्या १२ वाड्या १२ खेड़ी आणि म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४२ ग्रामपंचायत व गावे आहेत. त्यांची लोकसंख्या अंदाजे ४० हजार अशी मिळून म्हसवड शहर आणि परिसराची ८० हजार लोकसंख्या आहे. नागरिकांचे तलाठी, वीज मंडळ ग्रामीण, शहरी, विविध नॅशनल बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक पतसंस्था, बसस्थानक, आरोग्य केंद्र, दवाखाने, हॉस्पिटल, पोलीस ठाणे, नगरपालिका, माण तालुक्यातील सर्वात मोठी व्यापार लाईन कपडे, किराणा भुसार माल, नेटकॅफे, प्रसिद्ध सिद्धनाथ मंदिर आदी प्रमुख ठिकाणे आहे.
येथील आठवडा बाजार पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा असून, लाखाे नागरिक या ना त्या कामानिमित्त म्हसवडला येत असतात. आठवडा बाजारदिवशी तीन-चार वर्षांपासून दुय्यम निबंधक कार्यालय म्हसवड येथे नियमित येत होते. दुय्यम निबंधक कार्यालयाप्रमाणे दर बुधवारी तहसील कार्यालयही म्हसवडला आणण्याबाबत नागरिकांनी महसूल मंत्री यांच्याशी चर्चा करून निवेदन देऊन जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव करण्यात आला होता. मात्र, कोरोना व ऑनलाईन प्रोसेसच्या नावाखाली अधिकारी दर बुधवारी यायचे बंद केले आहे. यामुळे म्हसवड येथे इंग्रजांच्या काळापासून सुरू असलेले दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करावे, अशी मागणी म्हसवड व परिसरातील गावातील नागरिकांनी केली आहे.