फायनान्स कंपन्यांचा कर्ज वसुलीसाठी तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 04:04 AM2021-06-12T04:04:32+5:302021-06-12T04:04:32+5:30

फलटण : फलटण तालुक्यातील फायनान्स कंपन्यांकडून दुचाकी, चारचाकी वाहनधारक, मोबाईलधारक आणि बचत गटातील महिलांना लॉकडाऊनमधील हप्ते आणि व्याज भरण्यासाठी ...

Demand for recovery of debts of finance companies | फायनान्स कंपन्यांचा कर्ज वसुलीसाठी तगादा

फायनान्स कंपन्यांचा कर्ज वसुलीसाठी तगादा

Next

फलटण : फलटण तालुक्यातील फायनान्स कंपन्यांकडून दुचाकी, चारचाकी वाहनधारक, मोबाईलधारक आणि बचत गटातील महिलांना लॉकडाऊनमधील हप्ते आणि व्याज भरण्यासाठी तगादा सुरू झाला आहे. अनेकांवर हप्ते भरण्यासाठी दबाव आणला जात असल्याने कर्जाचे व्याज आणि हप्ता कोठून द्यायचा? असा प्रश्न कर्ज घेतलेल्या ग्राहकांसमोर उभा ठाकला आहे.

फलटण तालुक्यात अनेक खासगी फायनान्स कंपन्या कार्यरत असून, त्यांच्याकडून अनेकांनी चारचाकी वाहने, टीव्ही, मोबाईल, दुचाकी वाहने यासाठी कर्ज घेतले आहे. गेले तीन महिने कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे सर्वांचे व्यवहार ठप्प असून, अनेकांच्या हाताला काम नसल्याने काहीजण घरीच बसून आहेत. अनेकांची आर्थिक आवक थांबली आहे. या चिंतेत असताना आता फायनान्सवाले हप्त्याची मागणी करू लागले आहेत. त्यामुळे सर्वजण बेजार झाले आहेत. याचबरोबर फायनान्स कंपन्यांनी महिला बचत गटांनाही कर्ज दिले आहे.

काही महिलांनी फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची वसुली कोरोना महामारीतसुद्धा होत आहे. सर्वच उद्योगांवर गंडांतर आले आहे. महिलांच्या हातात तुटपुंजी रक्कमही मिळत नाही. उत्पादित माल कोणी घेत नाही तर हातावर पोट असणाऱ्या महिलांच्या हाताला मिळणारे काम बंद आहे. अशा अवस्थेतसुद्धा बचत गटाचे हप्ते भरण्याची तयारी या महिलांनी दाखवली होती. मात्र, आता उत्पन्नच थांबल्यामुळे त्यांना हप्ते काय व्याजही भरणे शक्य होत नाही.

फायनान्स कंपनीकडून येणाऱ्या अधिकाऱ्यांकडून हप्त्यासह व्याजाची वसुली करण्यासाठी तगादा लावला जात आहे. अशीच अवस्था इतर वस्तूंसाठी कर्ज घेतलेल्या कर्जदारांचीही आहे. वारंवार हप्ते भरण्यासाठी फोन केले जात आहेत. ज्यांनी आगाऊ धनादेश दिले आहेत त्यांना धनादेश बाऊन्स झाल्यास कायद्याच्या कचाट्यात अडकविण्याची धमकी दिली जात आहे. वसुलीसाठी सकाळी नऊच्या आतच घरापुढे फायनान्सवाले येऊन थांबत आहेत आणि धमक्या देत आहेत. घरातील वस्तू उचलून नेण्याची धमकी देत असल्याने अनेकजण दहशतीखाली वावरत आहेत.

(चौकट)

लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण अडचणीत आला आहे. काहींना दोनवेळचे जेवण नीट मिळत नाही. सर्वांचे व्यवहार ठप्प आहेत. अशा अवस्थेत खासगी फायनान्सवाले जर सक्तीची वसुली करून लोकांना त्रास देत असतील तर फायनान्सवाल्यांविरोधात रस्त्यावर उतरून हिसका दाखवावा लागेल. सक्तीच्या वसुलीला आमचा विरोध आहे.

- आमिरभाई शेख, अध्यक्ष

खासगी सावकार आणि फायनान्सविरोधी संघर्ष समिती, फलटण

Web Title: Demand for recovery of debts of finance companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.