कांदा उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:40 IST2021-09-11T04:40:24+5:302021-09-11T04:40:24+5:30
खटाव : सध्या बहुतांश ठिकाणी लोणंद लाल कांदा काढण्याची लगबग दिसून येत आहे. परंतु कांद्याला योग्य दर नसल्यामुळे तसेच ...

कांदा उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना फटका!
खटाव : सध्या बहुतांश ठिकाणी लोणंद लाल कांदा काढण्याची लगबग दिसून येत आहे. परंतु कांद्याला योग्य दर नसल्यामुळे तसेच हवामानाच्या बदलामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाल्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
खटाव व भुरकवडीच्या शिवेवर अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कांद्याची पसर केलेली दिसून येत आहे. दरवर्षी या कांद्याला जास्तीचा दर मिळत असल्यामुळे बरेच शेतकरी या कांद्याची लागवड करतात. गेल्यावर्षी या कांद्याला २० ते ३० रुपये प्रति किलोचा दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी होता. परंतु चालूवर्षी या कांद्याला दहा ते बारा रुपये प्रतिकिलो असा भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मूळ भांडवलाच्या रकमेपेक्षा कमीची रक्कम हातात पडत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
हवामानातील बदल, कांद्यावर पडलेला रोग, यामुळे शेतकऱ्याला दरवर्षीपेक्षा माल कमी निघत असल्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. लोणंद लाल कांदा नेहमीच भाव खाऊन जातो; परंतु कांद्याचे उतरलेले भाव शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करत आहे.
सरासरी एका एकरात दीडशे पिशव्या अंदाजे दीडशे टन माल निघतो; परंतु वारंवार हवामानात झालेल्या बदलामुळे कांदे व्यवस्थित पोसले गेले नाहीत. तसेच रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे.
कोट..
प्रतिवर्षी दीडशे ते दोनशे पिशव्या निघणारा कांदा यावर्षी शंभर पिशव्याच निघत आहे. त्यामुळे जेवढे भांडवल घातले आहे ते सुद्धा निघणे कठीण झाले आहे. एकरी पन्नास हजार रुपये खर्च या कांद्यासाठी येत असून, यावर्षीच्या दरामुळे अत्यंत बिकट परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे.
- गणपत कदम, कांदा उत्पादक शेतकरी, भुरकवडी
१०खटावभुरकवडीच्या माळावर लोणंद लाल कांद्याची पसार योग्य दराच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. (छाया : नम्रता भोसले)