मृतदेहाची आता टळेल हेळसांड!
By Admin | Updated: January 16, 2015 23:47 IST2015-01-16T20:52:21+5:302015-01-16T23:47:28+5:30
विच्छेदनाची सुविधा : पिंपोडे ग्रामीण रुग्णालय सज्ज

मृतदेहाची आता टळेल हेळसांड!
पिंपोडे बुद्रुक : ग्रामीण रुग्णालय पिंपोडे बुद्रुक येथील शवविच्छेदन कक्षाचे बांधकाम पूर्ण झाले असून आता कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील नागरिकांची खूप मोठी अडचण दूर होणार असून जवळच शवविच्छेदनाची सोय झाल्यामुळे मृतदेहाची हेळसांड थांबणार असून नातेवाईकांनाही मनस्ताप सहन करावा लागणार नाही.याबाबत वृत्त असे की, पिंपोडेचे ग्रामीण रुग्णालय नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेचा विषय ठरले होते. अनेकवेळा येथील कारभारामुळे हे रुग्णालय आंदोलनाचे ठिकाण बनले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून येथील वैद्यकीय अधीक्षकांनी रुग्णालयाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. आज रुग्णालयात किमान दररोज दोनशेच्या आसपास रुग्ण सेवेचा लाभ घेत आहेत. रुग्णालयासाठी शवविच्छेदन कक्षाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. मात्र, त्याकडे प्रशासकीय पातळीवरून दुर्लक्ष केले जात होते.एखादा अपघात अथवा दुर्घटना घडल्यास तो मृतदेह शवविच्छेदन केल्याशिवाय नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही. त्यामुळे आतापर्यंत सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, वाई, भुर्इंज याठिकाणी शवविच्छेदनासाठी मृतदेह घेऊन जावे लागत असे. यामध्ये पोलिसांसह संबंधित मृताच्या नातेवाईकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत असे. अनेक तास मृतदेह ताब्यात मिळण्यासाठी लागत असत. परिणामी वेळेसह पैशाचाही अपव्यय होत होता. त्याचबरोबर शवविच्छेदन अहवाल मिळण्यासाठी विलंब होत असे. त्यामुळे मृत्यूचे नेकमे कारण समजू शकत नव्हते. त्यामुळे नातेवाईकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.इमारतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या असून लवकरच शवविच्छेदनाची सोय उपलब्ध होणार असल्यामुळे येथील नागरिकांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे. (वार्ताहर)
शवविच्छेदन कक्षाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तांत्रिक बाबी पूर्ण आहेत. आवश्यक कर्मचारी मागणीसाठी प्रशासकीय पातळीवर पत्रव्यवहार केला आहे. लवकरच सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
- डॉ. ज्ञानेश्वर शितोळे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय पिंपोडे बुद्रुक
५० गावांना होणार लाभ
उत्तर व पूर्व कोरेगावकडील जवळपास ५० गावांना याचा लाभ होणार आहे. या श्वविच्छेदन कक्षासाठी आरोग्य सेवा संचालकांनी २४ जानेवारी २०१३ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. १३ जुलै २०१३ रोजी सुरू झालेले काम ३१ मार्च २०१४ रोजी पूर्ण झालेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ४ आक्टोबर २०१४ रोजी ही इमारत ग्रामीण रुग्णालय पिंपोडे बुद्रुकच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे हस्तांतरीत केली आहे. इमारत पूर्ण करण्यासाठी २१ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.