दसरा-दिवाळीपेक्षाही निवडणूक सण मोठ्ठा!
By Admin | Updated: September 18, 2014 23:28 IST2014-09-18T22:42:57+5:302014-09-18T23:28:16+5:30
निवडणुकीच्या निकालानंतर दोनच दिवसांनी दिवाळी असल्याने यंदा कुणाचा ‘अॅटमबॉम्ब’ वाजणार आणि कुणाचा ‘तोटा’ फुसका निघणार यावर विभागवार पैजा

दसरा-दिवाळीपेक्षाही निवडणूक सण मोठ्ठा!
राजेंद्र लोंढे-मल्हारपेठ -‘दसरा सण मोठा; नाही आनंदा तोटा’ म्हणत नवरात्र उंबरठ्याशी असताना आणि पाठोपाठ दिवाळी येत असतानाही ग्रामीण भागात निवडणूक हाच मोठ्ठा सण ठरला आहे. कार्यकर्त्यांच्या हालचाली गावोगावी वाढल्या असून, दसरा-दिवाळीला लाजवेल, अशी वातावरणनिर्मिती झाली आहे.
निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, पाटण तालुक्यात प्रत्येक निवडणुकीच्या वेळी दिसणारी न्यारी ‘झिंग’ जाणवू लागली आहे. आचारसंहितेच्या पालनाचा सरकारी कर्मचाऱ्यांकडून गाजावाजा सुरू झाला असला, तरी कामे खोळंबलेला माणूससुद्धा आपल्या कामापेक्षा निवडणूक महत्त्वाची मानून पारावर राजकीय गप्पा मारू लागला आहे. पाटण तालुक्यातील लढत नेहमीच तुल्यबळ असते. अशा तुल्यबळ गटांत यंदा बाजी कोण मारणार, याविषयी तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
पाटणमधील दोन्ही प्रबळ राजकीय गटांची ताकद समसमान असल्याचे पंचायत समितीच्या सभापती निवडीवेळी दिसून आले आहे. गावोगावी कार्यकर्ते, तरुण मंडळे यांच्यात दोन गट पडले आहेत. प्रत्येक जण आपापल्या गटासाठी तावातावाने सरसावून बोलू लागला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर दोनच दिवसांनी दिवाळी असल्याने यंदा कुणाचा ‘अॅटमबॉम्ब’ वाजणार आणि कुणाचा ‘तोटा’ फुसका निघणार यावर विभागवार पैजा लागल्या आहेत.