बिकट वाटेमुळे खांदेकऱ्यांची दमछाक- स्मशानभूमीच्या मरणयातना.

By Admin | Updated: August 11, 2014 00:15 IST2014-08-10T23:15:44+5:302014-08-11T00:15:05+5:30

उत्तर कोरेगाव : वीज, पाण्याची गैरसोय, शेडची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था

Dangers of gravel due to acute accidents - the death of the graveyard | बिकट वाटेमुळे खांदेकऱ्यांची दमछाक- स्मशानभूमीच्या मरणयातना.

बिकट वाटेमुळे खांदेकऱ्यांची दमछाक- स्मशानभूमीच्या मरणयातना.

कमलाकर खराडे - पिंपोडे बुद्रुक
पिंपोडे बुद्रुक परिसरात सोळशी, नायगाव, रणदुल्लाबाद, नांदवळ, सोनके, वाघोली, चौधरवाडी, घिगेवाडी यासह अनेक गावांमधून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. खाचखळग्यांच्या रस्त्याने पार्थिव नेताना खांदेकऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. विशेषत: पावसाळ्यात आणि रात्रीच्यावेळी तर मोठे दिव्य पार पाडावे लागते.
उत्तर कोरेगाव तालुक्यातील सर्वच गावे राजकीय आखाडे म्हणूनच प्रसिद्ध आहेत. याठिकाणचे मातब्बर पुढारी मात्र स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यात साफ अपयशी ठरल्याचे चित्र आहे. आश्वासनाशिवाय जनतेला काहीच मिळाले नाही. काही गावांमध्ये एक किलोमीटर अंतरावर स्मशानभूमी आहेत. पावसाळ्यात चिखलातून मार्ग काढताना नाकीनऊ येते. वाघोली, सोळशी, घिगेवाडी, सोनके, चौधरवाडी या गावांमधील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. काही ठिकाणी शेताच्या बांधावरून आणि शेतातूनही रस्ते गेले आहेत. पावसाळ्यात रात्रीच्या वेळी वयोवृद्ध लोक घसरून पडल्याची उदाहरणे आहेत. मग तात्पुरती रस्त्याला मलमपट्टी होते. मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या, अशी अवस्था होते.
स्मशानभूमी हा लोकांच्या भावनेशी निगडीत विषय आहे. परिसरातील सर्वच गावांमधून स्मशानभूमीच्या रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. तेथे सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

स्मशानभूमीमध्ये वीज, पाणी, नातेवाइकांना उभे राहण्यासाठी निवारा या सुविधा नसल्यामुळे पावसाळ्यात त्रेधातिरपीट उडते. काही ठिकाणी सौरदिवे बसविले होते, मात्र चोरट्यांनी त्याच्या बॅटरी काढून नेल्यामुळे केवळ खांब उरले आहेत. रात्रीच्या वेळी कंदिल, बॅटरी, गॅसबत्तीच्या उजेडात रस्ता शोधावा लागतो. विधीसाठी सायकलवरून पाणी आणावे लागते. याठिकाणी कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी, अशी मागणी होत आहे.
शेडची दुरवस्था
तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये स्मशानभूमी शेड आहेत. मात्र, उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची सवय लागल्याने अनेक ठिकाणी शेड वापराविना पडून आहेत. काही ठिकाणचे पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेले आहेत. अँगल चोरीस गेले आहेत.

Web Title: Dangers of gravel due to acute accidents - the death of the graveyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.