धोकादायक निवारा; पण हक्कासाठी आसरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2015 23:38 IST2015-05-15T22:05:41+5:302015-05-15T23:38:13+5:30
तब्बल दीडशे इमारती मोडकळीस : घर सोडण्यास नागरिकांचा नकार; पालिकेला कार्यवाही करण्यात अडचणी

धोकादायक निवारा; पण हक्कासाठी आसरा!
दत्ता यादव - सातारा संपत्तीच्या वादातून भाऊबंदकीमध्येच अनेकदा टोकाचे संघर्ष होत असतात. हे संघर्ष इतके विकोपाला जातात की, जीव गेला तरी बेहत्तर पण संपत्ती मिळालीच पाहिजे, अशी वृत्ती सध्या जनमाणसांमध्ये दिसू लागली आहे. शहरामध्ये तब्बल दीडशे इमारती धोकादायक असल्याची धक्कादायक महिती उघड होऊनही पालिकेचा नाईलाज झाला आहे. कारण ज्या इमारतीवर धोकादायक असा शिक्का पडला आहे. त्या इमारतीमध्ये राहाणाऱ्या कुटुंबांचे हेवेदावे न्यायालयात गेल्यामुळे कोणीच माघारी घेत नाही.
घर अंगावर केव्हाही कोसळण्याची शक्यता असतानाही केवळ घरावर हक्क राहावा, यासाठी अनेक कुटुंबे मृत्यूच्या सावलीखाली आपल्या संसाराचा गाडा हाकत असल्याचे विदारक चित्र साताऱ्यात समोर आले आहे.
गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना सिटीपोस्टाशेजारील जुन्या इमारतीची भिंत कोसळून दोघांना आपले प्राण गमवावे लागले होते. साताऱ्यामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारची दुर्घटना घडली होती. त्यामुळे जुन्या इमारतींचा मुद्दा आणि नागरिकांची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्याची चाहूल लागल्यानंतर पालिका प्रशासन शहरामध्ये किती इमारत धोकादायक आहे, याचा सर्व्हे करतेच ; परंतु या दुर्घटनेमुळे पालिका प्रशासनाने प्रकर्षाने याची गंभीर दखल घेतली आणि शहरातील दीडशेहून अधिक इमारती धोकादायक असल्याची बाब समोर आली. आता पुढे काय करायचे, असा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकला आहे. कारण परिस्थितीही तसीच आहे. घर खाली करा किंवा दुरूस्त करा, अशा स्वरूपाच्या नोटीसा पालिकेने प्रत्येकाला बजावल्या आहेत. परंतु या लोकांकडून पालिका प्रशासनाला कसलाच प्रतिसाद मिळत नाही. त्याची कारणेही अनेक आहेत. फार वर्षांपासून वास्तव्यास असणारे भाडेकरू, तसेच भाऊबंदकीचा वाद ही मुख्य कारणे आहेत. भाडेकरू व घरमालक तसेच भावांभावांतील वाद न्यायालयात गेल्यामुळे पालिका प्रशासनालाही कसलीही ठोस कारवाई करता येईना. केवळ धोक्याची सूचना देऊन कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करणेच पालिकेच्या हातात आता उरले आहे.
घर कधीही कोसळू शकते, हे माहित असूनही अनेक कुटुंबे घर सोडायला तयार नाहीत. पालिकेच्या आदेशानुसार जर घर सोडलं तर पुन्हा ताबा मिळेल का, याची खात्री त्यांना वाटत नाही. घर मालकाने अथवा घरातील नातेवाईकाने जर पुन्हा घर बळकावले तर काय होईल, या विचारानेच अनेकजण अशा मोडकळीस आलेल्या घरामध्ये जीव मुठीत घेऊन जगत आहेत. अनेकजणांचे न्यायालयात दावे सुरू असल्यामुळे पालिकेलाही बळाचा वापर करता येत नाही. यदाकदाचित दुर्देवी घटना घडली तर याला पालिकेलाच जबाबदार धरले जाणार. त्यामुळे इकडे विहीर तिकडे आड, अशी स्थिती पालिका प्रशासनाची झाली आहे.
जुने वाडे अन घरे..
४शहरात प्रामुख्याने जुने वाडे आणि घरे मोडकळीस आली आहेत. अपार्टमेंट सुस्थितीत आहेत. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना आणि अशा प्रकारच्या इमारती धोकादायक असल्याचे माहित असूनही प्रशासनाला काहीच करता येत नाही. इतकी हतबला प्रशासनाची स्पष्ट होत आहे.