दिवशी घाटात दरडीचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST2021-06-26T04:26:07+5:302021-06-26T04:26:07+5:30

सणबूर : ढेबेवाडी ते पाटण रस्त्यावरील दिवशी घाटामध्ये काही ठिकाणी दरडी सुटल्या असून, त्या कोणत्याही क्षणी ...

Danger of patient in Ghat during the day! | दिवशी घाटात दरडीचा धोका!

दिवशी घाटात दरडीचा धोका!

सणबूर : ढेबेवाडी ते पाटण रस्त्यावरील दिवशी घाटामध्ये काही ठिकाणी दरडी सुटल्या असून, त्या कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घाटामध्ये अनेक ठिकाणी लहान-मोठ्या दरडी यापूर्वी कोसळल्या आहेत. सध्या अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती असून, प्रवासी व वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.

दिवशी घाटामध्ये अनेक ठिकाणी डोंगराचा सुटलेला भाग कधीही ढासळण्याची शक्यता आहे. दिवशी घाट हा अरूंद व वळणाचा असल्याने वाहतुकीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनचालकांना जीवावर उदार होऊनच प्रवास करावा लागत आहे. घाटात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे अपूर्ण आहेत. ढेबेवाडी विभागातील गावांना पाटण हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शासकीय कामासाठी तसेच खरेदीसाठी ग्रामस्थांना पाटणला जावे लागते. तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी दररोज शेकडो विद्यार्थी या घाटातून पाटणकडे जात असतात. या घाटातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूकही होत असते.

ढेबेवाडी ते पाटण ही रहदारी सुखकर व्हावी, यासाठी या रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, हे काम योग्य पध्दतीने झाले नसल्यामुळे अगोदरच या मार्गात अनेक ठिकाणी अपघाताची भीती असते. त्यातच दरडीची भर पडल्याने प्रवासी व चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असून, या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे डोंगरातून मोठ्या प्रमाणात पाणी खाली वाहत असते. या पाण्यासोबतच लहान-मोठे दगड कोसळत असतात. त्यावेळी होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन वाहनचालक व प्रवासी सावध असतात. सध्या पाऊस सुरू असल्याने दरड कधी कोसळेल, हे सांगता येत नाही. घाटात अनेक ठिकाणी तीव्र वळणे आहेत. त्यामुळे वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे.

- चौकट

रस्त्यावर मुरूम; दुचाकीला धोका

दिवशी घाटामध्ये अनेक ठिकाणी दरडी सुटलेल्या होत्या. संबंधित विभागाने त्या काढल्या तरी काही ठिकाणी त्या पुन्हा सुटल्याने भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा, अशी मागणी होत आहे. तसेच घाटमार्गावर ठिकठिकाणी मुरूम पडला आहे. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होऊ शकतात.

- कोट

दिवशी घाटातून प्रवास करताना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. या घाटातील वेडीवाकडी वळणे तसेच कोसळणाऱ्या दरडी आणि अरूंद रस्ता यामुळे भीती वाटते. अनेकवेळा समोरून येणारे वाहन दिसत नाही. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

- रूपेशकुमार भोई,

प्रवासी, मंदुळकोळे खुर्द

Web Title: Danger of patient in Ghat during the day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.