सवलत पाससाठी शाळेला दांडी

By Admin | Updated: January 30, 2015 22:19 IST2015-01-30T21:57:51+5:302015-01-30T22:19:12+5:30

आगाराचा भोंगळ कारभार : विद्यार्थी रांगेत, कर्मचारी हॉटेलात

Dandi to school for concession pass | सवलत पाससाठी शाळेला दांडी

सवलत पाससाठी शाळेला दांडी

कऱ्हाड : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वाक्य आता हळूहळू नामशेष होतंय की काय, असे चित्र एकंदरीत कऱ्हाडच्या एस. टी. आगारामधून दिसून येत आहे. अनेक दिवसांपासून आगारातील सवलत पास विभागाकडून शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना पाससाठी नाहक त्रास दिला जात आहे.कऱ्हाड आगारात १२० हून अधिक एस. टी. बस असून, तालुक्यातील १९८ गावांतून कऱ्हाड येथे विविध शिक्षण घेण्यासाठी रोज ३० ते ४० हजारांहून अधिक विद्यार्थी ये-जा करत असतात. त्यामुळे कऱ्हाड आगाराला या शाळा, महाविद्यालय आणि विविध क्लासेसचे विद्याथी-विद्यार्थिनींकडून पासच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपयांचा फायदा होत असतो.आगारात एस. टी. पाससाठी दोन स्वतंंत्र खिडक्याही ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, या खिडकीच्या पासेच्या वेळा या अशा पद्धतीच्या आहेत की, यावेळेत विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहणेच जास्त गरजेचे असते. याशिवाय या वेळेदरम्यानच संबंधित कर्मचारी चहापाण्याला जात असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सवलत पाससाठी विद्यार्थ्याला पास संपल्यावर फक्त एकच दिवस आगारातील पास मिळण्याच्या ठिकाणी जाऊन रक्कम भरून स्वत:जवळचा जुना पास जमा करून नवीन पास घ्यावा लागतो. मात्र, तो घेण्यासाठी विद्यार्थ्याला आपला पूर्ण दिवस घालवावा लागत आहे. सवलत पास कक्षाच्या या भोंगळ कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. (प्रतिनिधी)

पासची वेळ वाढवावी....
सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत आणि दुपारी दोन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत अशी विद्यार्थ्यांच्या एस. टी. पासाची वेळ असल्यामुळे ही वेळ विद्यार्थ्यांसाठी सोयीची नाही. या वेळेत वाढ करून सायंकाळी सात वाजेपर्यंत पास मिळावेत, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. कॉलेजचे तास बुडवून दिवसभर सवलत पाससाठी रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे शैक्षणिक नुकसान तर होतेच याशिवाय त्रासही सहन करावा लागतो.
- महेश माने, विद्यार्थी, किरपे, ता. कऱ्हाड

Web Title: Dandi to school for concession pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.