सातारा : कोरोनासारख्या महामारीच्या काळात लोकसहभागातून गरजू रुग्णांना विलगीकरण कक्ष निर्माण करणे हा स्तुत्य उपक्रम असल्याचे गौरवोद्गार वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल घोंगडे यांनी काढले.
दहिगाव तालुका कोरेगाव येथील गावच्या व गावाशी नाळ असलेल्या लोकांच्या सहभागातून गरजू व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष तयार केला गेला आहे. त्याचे उद्घाटन स्वप्निल घोंगडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच महेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य, आशा, दक्षता समितीचे सदस्य, पोलीस पाटील उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, दहिगावचे कोणतेही काम पंचक्रोशीत आदर्श व प्रेरणादायी असते. पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात सर्वांत कमी गुन्हे असणारे हे गाव असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकसहभागातून तयार केलेल्या या विलगीकरण कक्षात पाच बेडची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे कोविड-१९ची लक्षणे असणारे व विलगीकरण सुचवले गेलेल्या रुग्णासाठी प्रथमोपचारासाठी आवश्यक साहित्य, डॉक्टर, आरोग्य सहायक उपलब्ध असणार आहेत.
सूत्रसंचालन दत्तात्रय खराडे यांनी केले. आभार सतीश चव्हाण यांनी मानले.