कृष्णेला शाप दप्तर दिरंगाईचा !
By Admin | Updated: April 3, 2015 23:55 IST2015-04-03T22:41:28+5:302015-04-03T23:55:28+5:30
खलित्यांची लढाई : प्रदूषण मंडळाच्या दहा नोटिसा ; पालिकेचा केंद्राला प्रस्ताव

कृष्णेला शाप दप्तर दिरंगाईचा !
दत्ता यादव - सातारा ‘संत वाहते कृष्णामाई,’ असे म्हणतात. परंतु ती स्वच्छ राखण्यासाठी करण्यात यावयाच्या उपाययोजनांच्या फायली त्याहीपेक्षा संत गतीने प्रवास करत असल्याचे दिसून आले आहे. या दप्तर दिरंगाईमुळे कृष्णा व वेण्णा नदी दिवसेंदिवस प्रदूषण होत असताना सरकारी कार्यालयात मात्र, खलितांची लढाई सुरू आहे. जिल्ह्णातील सातारा व वाई नगर पालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणत्याच हालचाली न केल्यामुळे कृष्णा व वेण्णा नदीमध्ये प्रदूषण होत असल्याचा ठपका विधानपरिषदेत चर्चेला गेला. एवढ्यावरच न थांबता मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना तुरुंगात टाकण्याचा इशारा देण्यात आला. यापार्श्वभूमीवर सांडपाण्याच्या प्रकल्पाविषयी प्रदूषण महामंडळ आणि नगर पालिकेमध्ये नेमका काय कागदोपत्री व्यवहार झाला, यासंदर्भात ‘लोकमत’ने माहिती घेतली असता शासकीय दिरंगाईचा नमुना कसा असतो, याची माहिती पुढे आली. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीमध्ये सोडले पाहिजे, असा नियम असल्यामुळे प्रदूषण महामंडळाने सातारा पालिकेला यासंदर्भात अनेकदा नोटिसा बजावल्या. तातडीने सांडपाण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले. मात्र, पालिकेकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नसल्याचे प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. करंजे, सदर बझार आणि गोडोली येथील ओढ्याचे पाणी कृष्णा आणि वेण्णा नदीला जात आहे. या सांडपाण्यावर प्रक्रिया करून शेतीसाठीही त्याचा वापर झाला पाहिजे, या दृष्टीने पालिका प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे आहे. परंतु शासकीय दिरंगाईमुळे हा प्रकल्प रखडल्याचे दिसून येत आहे. शहरामध्ये भूमिगत ड्रेनेज आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वर्षभरापूर्वीच पालिकेने केंद्राला प्रस्ताव सादर केला आहे. यासाठी लागणारे डिपॉझिटही भरण्यात आले आहे. परंतु हा मोठा प्रकल्प असल्यामुळे या प्रकल्पाला दोन ते तीन एकर जमीन उपलब्ध होणे गरजेचे आहे. परंतु साताऱ्यात एवढी विस्तीर्ण जागा पालिकेला मिळत नसल्यामुळे हा प्रकल्प रखडल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. या विभागांच्या टोलवाटोलवीमुळे कृष्णा व वेण्णा नदी दिवसेंदिवस प्रदूषण होत आहे. त्यामुळे विधानसभेत विचारलेल्या लक्षवेधीमुळे यानिमित्ताने हा विषय चर्चेत आला. परंतु आता यापुढे आणखी किती दिवस वेण्णा आणि कृष्णा नदी स्वच्छ व्हायला वेळ लागणार, याची शाश्वती नाही. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेला अनेकदा नोटिसा पाठविल्या. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. कृष्णा आणि वेण्णा या दोन्ही नद्यांमध्ये सध्या प्रदूषण होत आहे. - इंदिरा गायकवाड, (फिल्ड आॅफिसर, प्रदूषण महामंडळ) सांडपाण्याच्या प्रक्रियासंदर्भात केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु जागेअभावी हा प्रकल्प रखडला आहे. तरी सुद्धा लवकरच यावर तोडगा काढला जाईल. - अभिजित बापट, (मुख्याधिकारी, सातारा पालिका)