लोणंद: फलटण तालुक्यातील मुळीकवाडी गावच्या हद्दीत बाचकी नावाच्या शिवारात सुरेश पवार यांच्या मालकीच्या शेतात अंमली पदार्थ अफूची शेती आढळून आली. लोणंद पोलिसांनी कारवाई करत पावणे तीन लाखांचा अफू जप्त केला. याकारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुळीकवाडी गावातील बाचकी नावाच्या शिवारात सुरेश शिवराम पवार यांच्या मालकीच्या शेतात अमली पदार्थ आफुची लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. यावेळी 2720 झाडांची लागवड करून त्याची जोपासना केल्याचे आढळून आले. त्यामधील काही झाडांची बोंडे सोडून ती मक्याच्या पिकामध्ये लपवून ठेवली असल्याचे निदर्शनास आले.यावेळी पोलिसांना २ लाख ७७ हजार २०० रुपयांचा अफूचा माल मिळून आला. याबाबतची फिर्याद लोणंद पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल वैभव सावंत यांनी दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार करीत आहेत.
Satara: शेतात केली अफूची शेती, तीन लाखांचा अफू जप्त; लोणंद पोलिसांनी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 18:37 IST