साताऱ्यात नगरसेविकेसह सहाजणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:27 IST2021-05-31T04:27:38+5:302021-05-31T04:27:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: येथील कस्तुरबा नागरी आरोग्य केंद्रात टोकन नसतानाही विनाकारण गर्दी करत अरेरावी करून लसीकरण करण्यास भाग ...

साताऱ्यात नगरसेविकेसह सहाजणांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: येथील कस्तुरबा नागरी आरोग्य केंद्रात टोकन नसतानाही विनाकारण गर्दी करत अरेरावी करून लसीकरण करण्यास भाग पाडणाऱ्या माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान नगरसेविका स्मिता घोडके यांच्यासह सहाजणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नगरसेविका स्मिता घोडके व त्यांचे पती चंद्रशेखर घोडके यांच्यासह पद्मावती नारकर, सुभाषचंद्र हिरण, रसिला हिरण, दीपलक्ष्मी शालगर यांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, कस्तुरबा नागरी आरोग्य केंद्रात शनिवार, दि. २९ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास टोकन वाटप करून लसीकरण सुरू होते. यावेळी सर्वजण रांगेत उभे राहून शासन नियमांचे पालन करत होते.
याचवेळी नगरसेविका स्मिता घोडके, चंद्रशेखर घोडके (वय ५३, रा. सातारा), पद्मावती नारकर (७१, रा. सातारा), सुभाषचंद्र हिरण (६८, रा. सातारा), रसिला सुभाषचंद्र हिरण (६८, रा, सातारा), दीपलक्ष्मी सचिन शालगर (४६, रा. सातारा) हे सर्वजण तेथे आले. त्यांनी आरोग्य केंद्रात विनाकारण गर्दी केली. यावेळी त्यांनी अरेरावी करत टोकन नसतानाही लसीकरण करण्यास भाग पाडले. दरम्यान, अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवक घाबरून गेले.
याबाबतची तक्रार परिचारिका सुजाता सुरेश साठे (२४, रा. बावधन, ता. वाई) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर नगरसेविका स्मिता घोडके यांच्यासह सहाजणांवर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे हे करत आहेत.