यादी तयार; पण इच्छुकहटेनात !
By Admin | Updated: April 18, 2015 00:04 IST2015-04-17T23:38:32+5:302015-04-18T00:04:55+5:30
जिल्हा बँकेत खलबते : रामराजे-लक्ष्मणराव पाटील यांच्यात तीन तास गुफ्तगू

यादी तयार; पण इच्छुकहटेनात !
सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची प्रातिनिधिक यादी तयार झाली असून, येत्या २२ एप्रिलला पक्षाचे नेते अजित पवार यांच्यापुढे ही यादी मांडली जाणार असल्याची खबर सूत्रांनी दिली. दरम्यान, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शुक्रवारी (दि. १७ ) जिल्हा बँकेच्या प्रशासकीय इमारतीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांच्याशी त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गुफ्तगू केली. अध्यक्षांच्या दालनातील ‘अँटीचेंबर’ मध्ये ही गुफ्तगू झाली. या चर्चेवेळी आमदार प्रभाकर घार्गे, बँकेचे उपाध्यक्ष रवींद्र कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, संचालक अनिल देसाई, राजेंद्र राजपुरे या निवडणुकीसाठी उभ्या असणाऱ्या उमेदवारांची उपस्थिती होती. दुपारी तीन वाजता ही मंडळी बँकेत दाखल झाली होती. उशिरापर्यंत एकमेकांशी चर्चा करत होती. जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी रामराजेंना छेडले असता त्यांनी बँक निवडणुकीच्या चर्चेसाठी बसलो नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत वरिष्ठ पातळीवरून निर्णय अपेक्षित आहे. तसेच पॅनेलचे निर्णय जिल्हा बँकेत बसून घ्यायचे नसतात, अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली.
सोमेश्वर कारखान्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही एकत्र जमलो होतो. तात्यांनाही बऱ्याच दिवसांत भेटलो नव्हतो. मात्र, बॅँक निवडणुकीत आमच्या पक्षाला कसलीच चिंता नाही. - रामराजे नाईक-निंबाळकर
‘अर्ज माघारी’चा तणाव
जिल्हा बँकेच्या प्रशासकीय इमारतीतील या चर्चेदरम्यान मोजक्याच मंडळींना प्रवेश दिला जात होता. सुमारे अडीच ते तीन तास रामराजे बँकेत ठाण मांडून होते. उमेदवारीसाठी राष्ट्रवादीतूनच मोठी चढाओढ असल्याने कोणाला अर्ज माघारी घ्यायला लावायचे, याचा तणाव रामराजे व लक्ष्मणराव पाटील यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.सातव्या दिवशीही अर्ज मागे नाही
अर्ज मागे घेण्याच्या सातव्या दिवशी एकही अर्ज मागे घेतला गेला नाही. त्यामुळे या निवडणुकीतील उत्सुकता वाढली आहे. सत्ताधारी गटाच्या पॅनेलमध्ये संधी मिळण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावण्याचे काम मात्र सुरू ठेवले आहे.