CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनमुळे डोंगराची काळी मैना जाळीतच अडकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 14:19 IST2020-05-20T14:18:51+5:302020-05-20T14:19:42+5:30
वरकुटे-मलवडी : दुष्काळी माण तालुक्याच्या डोंगरदऱ्यातील मधूर चवीच्या, काळ्यानिळ्या चमकणाऱ्या टपोऱ्या करवंदाची (काळी मैना) ख्याती सर्वांच्याच परिचयाची आहे. सध्या वसंत ऋतूत ...

CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनमुळे डोंगराची काळी मैना जाळीतच अडकली
वरकुटे-मलवडी : दुष्काळी माण तालुक्याच्या डोंगरदऱ्यातील मधूर चवीच्या, काळ्यानिळ्या चमकणाऱ्या टपोऱ्या करवंदाची (काळी मैना) ख्याती सर्वांच्याच परिचयाची आहे. सध्या वसंत ऋतूत घरोघरी विकत घेऊन चवीने खाल्ला जाणारा रानमेवा लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत न येता काटेरी जाळीतच अडकू न पडला आहे.
ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ माजवल्याने प्रशासनाने संचारबंदी सुरू केल्याने गावोगावी भरणाऱ्या जत्रा, आठवडा बाजारावर बंदी घातली आहे. त्यामुळे माण तालुक्यातील भोजलिंग डोंगर, विरळी खोरे, वळई, जांभुळणी, चिलारवाडी, पुकळेवाडी, पाचवड, कुकुडवाडच्या डोंगराळ भागातील दऱ्याखोऱ्यात पिकणारी आंबटगोड चवीची करवंद फिरून विकणाऱ्यांचा हक्काचा रोजगार बुडाला आहे. त्यांच्या पोटाची खळगी भरणाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात बहरणारा रानमेवा स्थानिक नागरिक रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता रानावनात हिंडून, काटेरी जाळीत शिरून गोळा करतात. माण तालुक्यात उन्हाळ्यात देवदेवतांच्या भरणाऱ्या जत्रा, गावोगावच्या आठवडा बाजारात विकतात.
डोंगराळ भागात पिकलेल्या करवंदांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने पाच, दहा रुपयांची किरकोळ विक्री ग्लास, कपाच्या मापाने पळसाच्या मोठ्या पानांवर खायला दिला जातो. तर दीडशे ते दोनशे रुपये प्रतिकिलोनेही करवंदाची विक्री केली जाते. मे आणि जून या दोन महिन्यांत घरोघरी जाऊन विक्री करून पोट भरणाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
मे आणि जून या महिन्यांतच करवंद आणि जांभूळ यासारखी फळे पिकतात. यांच्या मधूर चवीने आणि आयुर्वेदिक गुणांनी भरलेली फळे उन्हाळ्यात खायला लाभदायक असतात. जिभेवर ठेवताच तासन्तास त्याच्या विशिष्ट चवीची आठवण करून देणारा रानमेवा यावर्षी मात्र लॉकडाऊनमुळे मिळेनासा झाल्याने आठवणीतच रेंगाळत राहिला आहे.