CoronaVirus Lockdown : चार दिवसांपासून कुटुंब राहत होते मृतदेहासोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 13:25 IST2020-05-18T13:22:34+5:302020-05-18T13:25:26+5:30
कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावळी तालुक्यातील म्हातेखुर्द येथे दुर्धर आजाराने त्रस्त असणाऱ्या एका युवकाचा राहत्या घरात तीन दिवसापूर्वीच मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे या मृदेहाबरोबरच अख्ख कुटूंब आपले दैनंदिन काम घरात राहूनच करीत होते.

शवविच्छेदनसाठी मुतदेह शासकिय रुग्णालयात नेत असताना आरोग्यकर्मचारी
सायगाव :कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावळी तालुक्यातील म्हातेखुर्द येथे दुर्धर आजाराने त्रस्त असणाऱ्या एका युवकाचा राहत्या घरात तीन दिवसापूर्वीच मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे या मृदेहाबरोबरच अख्ख कुटूंब आपले दैनंदिन काम घरात राहूनच करीत होते.
तीन दिवसानंतर घरातून तीव्र स्वरूपाची दुर्गंधी बाहेर येत असल्याने संबंधित युवकाच्या मृत्यूची घटना उघडकीस आली. आर्यन जयवंत दळवी ( वय १५ ) असे या युवकाचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण जावळी तालुक्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन जयवंत दळवी (रा. म्हाते खुर्द) याचा ४ दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. एका दुर्धर आजाराने तो त्रस्त होता. त्याच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र कोरोनाच्या संक्रमणामुळे आर्यनच्या कुटुंबीयांना उपचारासाठी आर्यनला कुठेच नेता आले नाही.
या आजारानेच त्याचा जीव घेतला. मात्र आता शवविच्छेदनानंतर त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ही बाब समोर येणार आहे. तोपर्यंत जावळी तालुक्यातल्या परिसरातील नागरिकांमध्ये सध्यातरी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झालेला असताना देखील घरात त्याच पद्धतीने सतत असणारा मृतदेह पडून मृतदेहावर किडे देखील पडले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मृतदेहाची दुगंर्धी संपूर्ण परिसरात होऊ लागल्याने गावातच यासंदर्भात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान पोलिस प्रशासनाला यासंदर्भात गावातल्याच काही नागरिकांनी माहिती दिल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
घटनास्थळावर तत्काळ पोलीस आणि प्रशासन पोहोचल्यानंतर घरात तीन दिवसांपूर्वीच सडलेला त्या युवकाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी सातारा येथे पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे यांनी दिली. मात्र वडिलांनी कोणालाही न सांगता घरातच बॉडी ठेवली, त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
म्हाते येथे युवकाचा आढळलेला मृतदेह २४ तासापेक्षा जास्त ७२ तासापर्यंत झालेला असावा. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्यात जंतू झाले होते. २४ तासांपूर्वी मृत्यू झाल्याने नियमानुसार कोरोनाची टेस्ट घेता येत नाही. त्यामुळे सातारा ऐवजी मेढयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणला.
डॉ. भगवानराव मोहीते.
तालुका आरोग्य अधिकारी पं.स. जावळी .