Coronavirus: कराड शहरातील पोलिसांसाठी गरमागरम चहा- नाश्त्याची सोय; सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 19:40 IST2021-05-20T18:53:48+5:302021-05-20T19:40:43+5:30
साताऱ्यात जिल्ह्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी अनेक पोलीस रस्त्यावर पहारा देत आहेत.

Coronavirus: कराड शहरातील पोलिसांसाठी गरमागरम चहा- नाश्त्याची सोय; सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार
सातारा – गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशासमोर कोरोनाच्या महामारीचं प्रचंड मोठं संकट उभं राहिलं आहे. या संकटात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस या कोविड योद्धांनी आपल्या जीवाची बाजी लावत लोकांच्या रक्षणासाठी पुढे राहिले. यात अनेकांचे प्राण गेले. मात्र आजही ही अविरत सेवा अशीच सुरू आहे. यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात १५ एप्रिलपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
साताऱ्यात जिल्ह्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी अनेक पोलीस रस्त्यावर पहारा देत आहेत. अशाच पोलिसांना मदत करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. कराड येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश गुरव, बिपिन मिश्रा यांनी पोलीस हवालदार विजय पन्हाळे आणि रघुनाथ देसाई यांच्या सहकार्याने शहरातील १००-१५० पोलिसांच्या नाश्त्याची सोय करून दिली आहे. बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना शिरा, उपमा आणि चहा दिला जात आहे.
कराड तालुक्यात ९ हजार व्यक्तींना कोरोनाची बाधा त्यातील साडेसहा कोरोनामुक्त
कराड तालुक्यातील कोरोना संसर्गाचा वेग फेब्रुवारीपासून कायम आहे. गेल्या ४ महिन्यात कराड तालुक्यात ९ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली. तर त्यापैकी साडेसहा हजार लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले. कोरोना संक्रमण वाढले असून गावोगावी रुग्णांची साखळी निर्माण झाली आहे. रुग्णांवर उपचार सुरू करण्यापासून निकट सहवासातील व्यक्तींच्या चाचण्या करण्यावरही भर दिला जात आहे.